दिडपट हमीभाव वाढ राजू शेट्टी यांना का भूलथाप वाटते

प्रतिनिधी
Wednesday, 3 June 2020

आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता वास्तविक कडधान्य व तेलबिया वर्गीय पिकांच्या हमीभावात जादा वाढ करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे होते.

जयसिंगपूर : केंद्र सरकारने जाहीर केलेली पिकांची किमान आधारभूत किंमत ही महागाईच्या निर्देशांकानुसारही मिळालेली नसून दिडपट हमीभाव म्हणजे भुलथापच असल्याची टीका, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली  आहे.
दुष्काळ, नोटबंदी, महापूर, अतिवृष्टी, वादळी वारे, टोळधाड, कोरोना व डिझेलचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून कर्जमाफी होऊनही शेतकरी आर्थिक आरिष्टात सापडला आहे. केंद्र सरकारने ज्या पिकांचे उत्पादन कमी आहे, अशा पिकांच्या हमीभावात जादा दरवाढ जाहीर केली आहे. व ज्या पिकांचे देशात मुबलक प्रमाणात उत्पादन होते, अशा पिकांच्या हमीभावात कमी दरवाढ केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता वास्तविक कडधान्य व तेलबिया वर्गीय पिकांच्या हमीभावात जादा वाढ करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे होते.
दिडपट हमीभाव सोडा, ज्या पटीत डिझेल, खते, बि-बियाणे, मजुरी वाढली. त्या पटीत तरी हमीभाव वाढविणे गरजेचे होते. केंद्र सरकारचे शेतीमाला विषयक अस्थिर धोरण आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेती विषयक अस्थिर धोरणामुळे अल्पभूधारक शेतकरी आता शेतमजूर होत आहे आणि शेतमजूर हा नोकरीच्या शोधात शेतीतून स्थलांतरीत होत असून शेती उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे श्री शेट्टी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whay raju shetti say increase in crop minimum support price Misleading