
सात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या, उंच दिव्यांचे चार खांब, कितीही मोठा पाऊस पडला तरी पुढील अर्ध्या तासामध्ये सामना पुन्हा सुरू होण्याची शाश्वती. रणजी सामन्यांसह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित अन्य मानाच्या स्पर्धा घेणे शक्य. हे संपूर्ण वर्णन कोल्हापुरात आकाराला येणाऱ्या नवीन क्रीडांगणाचे आहे. एकेकाळी काळे ग्राऊंड म्हणून ओळख असणाऱ्या या मैदानाचा आता कायापालट होत आहे. मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील हंगामामध्ये हे मैदान नामवंत खेळाडूंनी गजबजलेले असणार आहे.
शहरात सध्या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील अनेक मैदाने उपलब्ध आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे शास्त्रीनगर मैदान. सुरवातीला या मोकळ्या माळावर दलदल आणि चिखल होता. मोठ्या झुडपांनी परिसर व्यापला होता. एका कोपऱ्यात क्रिकेट खेळत सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशनची स्थापना झाली आणि तेथून या मैदानाने मूर्त रूप घेण्यास सुरवात झाली. त्यापूर्वी मैदानाची काळे ग्राऊंड म्हणून ओळख होती. या मैदानावर जनावरे चरण्यासाठी सोडली जात असत. सागरमाळ स्पोर्टस्चे खेळाडू जिल्ह्यात अनेक ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी जात आणि तेथून जिंकलेल्या स्पर्धेच्या रक्कमेतून या ग्राऊंडच्या उभारणीला सुरवात झाली. त्यानंतर अनेक वर्षे या मैदानावर स्थानिक स्पर्धा झाल्या; मात्र आता मूर्त रूप यायला सुरवात झाली आहे. सध्या या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून दिव्यांचे चार टॉवर उभारण्यात आले आहेत. प्रत्येक टॉवरवर 40 असे एकूण 160 दिवे लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या लाईटमुळे दिवस- रात्रीचे सामने खेळवणे शक्य होणार आहे. सध्या या मैदानाच्या टर्फचे काम सुरू आहे. त्यापूर्वी हे संपूर्ण मैदान खोदून या ठिकाणी अत्याधुनिक दर्जाची ड्रेनेज सिस्टीम बसवण्यात आली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी अथवा सामना सुरू असताना पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास या ड्रेनेज व्यवस्थेचा उपयोग होणार आहे. मैदानाचे आयुर्मान अधिक राहावे, या दृष्टीने अनेक विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत. मैदानामध्ये जमिनीमधून झिरपून पाणी येऊ नये व मैदान खराब होऊ नये, यासाठी वेगळी ड्रेनेज यंत्रणा उभारलेली आहे. मैदानावर असणाऱ्या सैद स्क्रीनची रचना ही सुलभ असून एका व्यक्तीने हाताळण्याइतकी सोपी आहे. मैदान बनवण्यासाठी जगातील सर्वाधिक मोठे मैदान असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या धर्तीवरील काही सुविधांचे अनुकरण केले आहे. तसेच संपूर्ण मैदानावर स्वयंचलित पाणी फवारणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी उतार असणारी बैठक व्यवस्था बनवण्याचे काम सुरू आहे. यानंतर मैदान बंदिस्त करण्याच्या आणि पॅव्हेलियन बनवण्याच्या कामाला सुरवात होणार आहे.
असे आहे मैदान
या मैदानासाठी चार कोटी रुपयांचे बजेट आहे. मैदानाचे सहा एकराहून अधिकचे क्षेत्रफळ आहे. यामध्ये सात इंटरनॅशनल विकेट, टर्फ ग्राऊंड, ऑस्ट्रेलियन लॉन असणार आहे. दिवस-रात्र सामने खेळण्यासाठी या ठिकाणी लाईटची अद्ययावत सुविधा कार्यान्वित केली आहे. याची उंची 100 फूट इतकी आहे. सध्या मैदानावर प्रॅक्टिससाठी चार टर्फ, तर तीन सिमेंट विकेट आहेत. मैदानावर तीन खेळपट्ट्या आहेत. रोज 600 हून अधिक जण येथे प्रॅक्टिस आणि ट्रेनिंगसाठी उपस्थित असतात.
चौकट
मैदानाची वैशिष्ट्ये
4 कोटी रुपयांचे बजेट
7 जागतिक दर्जाच्या खेळपट्ट्या
100 फूट उंच चार लाईट टॉवर
प्रत्येक टॉवरला 40 लाईट
ऑस्ट्रेलियन लॉन
संपूर्ण बंदिस्त मैदान
खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा
सद्यस्थिती
-मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात.
- टर्फचे काम सुरू असून मे महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता.
- बैठक व्यवस्थेचे काम शिल्लक
- चेंजिंग रूम व पॅव्हेलियन कामाची सुरवात नाही
- प्रॅक्टिस विकेट पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत.
-प्रश्न
- शहरातील गजबजलेल्या परिसरात मैदान. यामुळे पार्किंग उपलब्ध नाही
- मैदानाभोवती नागरी वस्ती
- परिसरामध्ये भटक्या जनावरांचा वावर
- मैदानात प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी एकच द्वार
- अधिक उंच सुरक्षा भिंतीची गरज
उपाययोजना
मैदानाभवतालीने एकेरी पार्किंग शक्य
प्रवेशद्वाराची संख्या वाढवावी लागणार
भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अधिक उंच सुरक्षा कठडा निर्माण करणे
मैदानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमणे
प्रॅक्टिस विकेट पुन्हा सुरू करणे
रणजी सामने होण्याची आशा पल्लवित
पश्चिम महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या इतिहासातील हे अशा स्वरूपाचे पहिले मैदान ठरणार आहे. कोल्हापूरमधून हद्दपार झालेले रणजी सामने येथे पुन्हा सुरू होण्याची आशा या मैदानामुळे पल्लवित होणार आहे. या मैदानामुळे जिल्ह्याच्या खेडोपाड्यांतील मुलांमध्ये क्षमता आहे, अशा मुलांना व्यासपीठ मिळेल. टेनिस बॉलबरोबरच लेदर बॉलचे देखील शास्रशुद्ध प्रशिक्षण येथे मुलांना उपलब्ध होणार आहे.
काकासाहेब पाटील, अध्यक्ष, सागर माळ स्पोर्टस् असोसिएशन.
अनोखे मैदान
या मैदानावर अनेक वर्षे खेळतो आहे. अगदी दलदलीचे असणारे हे ठिकाण नागरिकांसाठी कचरा टाकण्याचे केंद्र होते. या ठिकाणी सध्या सुसज्ज मैदान उभे आहे, हे स्वप्नवत आहे. या मैदानाच्या रूपाने अनेक नवोदित खेळाडूंना एक संधी प्राप्त झाली आहे. हे मैदान स्वतःमध्येच एक अनोखे मैदान असून या नव्या मैदानावर खेळण्याची उत्सुकता आहे. लवकरच या मैदानावर पुन्हा सामने सुरू होतील.
किरण खतकर (खेळाडू).
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मैदान
मैदान जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मैदान असणार आहे. या मैदानासाठी काकासाहेब पाटील आणि सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशनच्या प्रत्येकानेच विशेष मेहनत घेतली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हे मैदान पूर्ण होणार असून पुढील हंगामामध्ये हे मैदान स्पर्धांसाठी सज्ज असणार आहे. या मैदानामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून अन्य राज्यांतील आणि मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना खेळाडूंना याचा फायदा होणार आहे.
चेतन चौगुले (अध्यक्ष - केडीसीए).
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.