प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार देण्याचा मुहूर्त कधी?ः समरजितसिंह घाटगे यांचा राज्य सरकारला सवाल

वि. म. बोते
Monday, 10 August 2020

कर्जमाफीमध्ये प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला नव्हता. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात श्री घाटगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता.

कागल, कोल्हापूर : राज्य शासनाने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान त्यांनी जून अखेर त्यांचे कर्ज भरल्यास देण्याची घोषणा केली आहे. आज सव्वा महिन्यांपेक्षा जादा कालावधी उलटून सुद्धा अद्याप शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतलेला नाही. हे अनुदान देण्याचा मुहूर्त शासन कधी काढणार? असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला आहे. 
कर्जमाफीमध्ये प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला नव्हता. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात श्री घाटगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखांचे अनुदान मिळावे, दोन लाखांच्या वरील कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळावी, अशा मागण्या केल्या होत्या. 

प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे शासनाने मान्य करून प्रामाणिक शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानी त्यांच्या नावावरील कर्ज 30 जून अखेर भरावे. म्हणजे हे अनुदान देता येईल असे सांगितले होते. शेतकऱ्यांनी हे कर्ज भरून आता सव्वा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र शासनाकडून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.हा या शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे.शासनाने हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी श्री घाटगे यांनी केली आहे. 

दोन लाखांवरील थकबाकीदारांना रक्कम नाही 
दोन लाखापेक्षा जास्त कर्ज रक्कम असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखाच्या वरील रक्कम भरल्यानंतर दोन लाखापर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, दोन लाखाच्या आत कर्ज रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर जुलै 2020 अखेर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. दोन महिन्यापूर्वी आधार प्रमाणीकरण करून सुद्धा कांही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. यावर तातडीने निर्णय घ्यावा.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when is the time to give Rs 50,000 to Honest farmers ?: SamarjitSingh Ghatge questions the state government