महापूर, अतिवृष्टीतील भरपाईचे 25 कोटी मिळणार तरी कधी? 

सुनील पाटील 
सोमवार, 29 जून 2020

पिकांची नुकसानभरपाई म्हणून जाहीर रकमेपैकी अद्याप 25 कोटी रुपये शासनाकडून येणे आहेत. 

कोल्हापूर : गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे नष्ट झालेल्या पिकांची नुकसानभरपाई म्हणून जाहीर रकमेपैकी अद्याप 25 कोटी रुपये शासनाकडून येणे आहेत. नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. 
जिल्ह्यात ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे ऊस, भुईमूग, भात, सोयाबीन, सूर्यफूलासह इतर पिके कुजून गेली होती. जिल्हा प्रशासन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याचे पंचनामे केले होते. ज्यांची पिके कुजली आहेत, पाण्यामुळे खराब झाली आहेत अशांसाठी त्यावेळी उसासाठी गुंठ्याला 950 रुपये जाहीर करण्यात आले होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही रकमेचे वाटप करण्यात आले; मात्र कोरोनामुळे करवीर, शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचे 25 कोटी रुपये अडकून पडले आहेत. शेतातील उभे पीक कुजल्याने उत्पन्नच ठप्प झाले. अशातच सरकारने नवीन बियाण्याची लावण करण्यासाठी भरपाईची घोषणा केली. जाहीर झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, ही रक्कम मिळावी यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शासनाकडे मागणी केली आहे. 

गेल्यावर्षी पावसाचा आणि महापुराचा सर्वाधिक फटका जनावरे व पिकांना बसला आहे. शासनाने भरपाई जाहीर केली. काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. सध्या पेरणी केलेल्या भात, भुईमुगाला खतांची मात्रा देणे अपेक्षित आहे. शासनाने जाहीर केलेली रक्कम मिळाल्यास खते घेण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. 
- यशवंत व्हरांबळे, शेतकरी, वरणगे. 

दृष्टिक्षेप 
- नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचण 
- ऊस, भुईमूग, भात, सोयाबीन, सूर्यफूलासह पिके कुजून गेली 
- उसासाठी गुंठ्याला 950 रुपये जाहीर 
- शेतकऱ्यांना काही रकमेचे वाटप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will we get Rs 25 crore