"ढबू'चा अख्खा प्लॉटच मेंढ्यांसाठी खुला 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

बेळगाव मार्केटला आवश्‍यक असणारे इंद्रा ढबू मिरचीचे उत्पादन घ्यायचे ठरले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तोड आली. तोपर्यंत कोरोनाच्या लॉकडाउनमुळे ही ढबू मिरची शेतातच अडकली. स्थानिक मार्केटला त्याला मागणी नाही. हक्काचे मार्केट असणारा बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. परिणामी या मिरचीचा उठावच न झाल्याने उत्पादकाने ढबूचा अख्खा प्लॉटच मेंढ्यांना चारण्यासाठी खुला केला. भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे हा प्रकार घडला.

गडहिंग्लज : बेळगाव मार्केटला आवश्‍यक असणारे इंद्रा ढबू मिरचीचे उत्पादन घ्यायचे ठरले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तोड आली. तोपर्यंत कोरोनाच्या लॉकडाउनमुळे ही ढबू मिरची शेतातच अडकली. स्थानिक मार्केटला त्याला मागणी नाही. हक्काचे मार्केट असणारा बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. परिणामी या मिरचीचा उठावच न झाल्याने उत्पादकाने ढबूचा अख्खा प्लॉटच मेंढ्यांना चारण्यासाठी खुला केला. भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे हा प्रकार घडला. 

मलाप्पा कोरी असे या भाजीपाला उत्पादकाचे नाव आहे. या मिरचीची साल जाड असते. ती अधिक दिवस टिकते. म्हणून त्याला रेस्टॉरंटमध्ये मागणी जास्त असते. बेळगाव मार्केट हे या ढबूचे हक्काचे मार्केट. दरम्यान, कोरोना लॉकडाउनमध्ये अत्यावश्‍यक सेवेत भाजीपाल्याचा समावेश असला तरी बेळगाव जिल्हा रेड झोनमध्ये गेल्याने भाजीपाल्याची आवक-जावक बंद आहे. साहजिकच ढबू मिरची शेतात अडकली. स्थानिकाला 50 ते 60 किलो ढबूची विक्री झाली. उत्पादनाच्या तुलनेत विक्री होत नसल्याने कोरी हतबल झाले आहेत. एकरी 15 ते 20 टन उत्पादन देणारा हा ढबू अखेर त्यांनी बकऱ्यांसाठी खुला केला. 

दरम्यान, भडगाव व चन्नेकुप्पी गावात खास भजीसाठी बटका मिरचीचे उत्पादनही घेतले जाते. यंदा 10 एकरांत बटका मिरची आहे. अजित कोरी, मलाप्पा कोरी, राजू कोरी, विठ्ठल मदिहाळी, सुभाष एंड्रोळे, अमर चव्हाण, शिवानंद नेजी आदी त्याचे उत्पादक आहेत. या मिरचीलाही स्थानिकला मागणी नाही. बेळगाव व हैद्राबाद येथील मार्केटला दरवर्षी ही मिरची जाते. यंदा लॉकडाउनमुळे ही मिरचीही शेतात अडकली आहे. दहा एकरांमधील या मिरचीच्या उत्पादकांना यंदा 20 लाखांचा फटका बसला आहे. 

52 एकरांवर भाजी 
भडगाव, चन्नेकुप्पीसह परिसरात यंदा 52 एकरांवर सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. दर पडल्याने यातही तोटा होत आहे. त्यातच कर्नाटकातून स्वस्तातील भाजी बंद झाल्याने आता व्यापारी कोल्हापुरातून टेम्पो भरून स्वस्त भाजी आणत आहेत. त्यामुळे स्थानिक भाजीपाल्याला उठाव नाही. परिणामी उत्पादक हतबल झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Whole Plot Of Capcicum Is Open For Sheep Kolhapur Marathi News