esakal | शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची जबरदस्ती का ? 
sakal

बोलून बातमी शोधा

Why force teachers to attend school?

जिल्ह्यातील काही मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे, यासाठी जबरदस्ती करीत आहेत.

शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची जबरदस्ती का ? 

sakal_logo
By
संजय पाटील

घुणकी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ शाळा सुरू करण्याची तयारी व ई-लर्निंगबाबत ज्यांची उपस्थिती अत्यावश्‍यक आहे, अशा शिक्षकांना आठवड्यातून दोन दिवस बोलवावे व इतरांना "वर्क फ्रॉम होम'ची सवलत द्यावी, असे स्पष्ट शासन आदेश असताना जिल्ह्यातील काही मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे, यासाठी जबरदस्ती करीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आणि शाळेत काम नसताना शिक्षकांना बोलवून मुख्याध्यापकांनी धोका पत्करू नये, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एन. डी. बिरनाळे यांनी "सकाळ'शी बोलताना केली. 

शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या पत्रानुसार शिक्षकांना एकाच दिवशी बोलावू नये, महिला शिक्षिका, गंभीर आजार असलेले व 55 वर्षांवरील पुरुषांना "वर्क फ्रॉम होम' ची सवलत द्यावी व "वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या शिक्षकांचा आढावा आठवड्यातून एकदा घ्यावा असे स्पष्ट आदेश असतानाही काही मुख्याध्यापक शिक्षकांना उपस्थितीची सक्ती करीत आहेत. अशा मुख्याध्यापकांनी शिक्षकांना आठवड्यातून दोनदिवस शाळेत उपस्थित राहण्यास सांगावे व शिक्षकांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षक वर्गाकडून होत आहे. 

शासन व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्याध्यापकांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे. शिक्षकांना शाळेत थांबावेच लागते. चुकून एखाद्या शिक्षकास संसर्ग झाल्यास मुख्याध्यापक अडचणीत येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याशिवाय मुख्याध्यापकांनी शिक्षकांना बोलविण्याचे धाडस करू नये. 
- एन. डी. बिरनाळे, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना 

शिक्षकांना दररोज शाळेत येण्याची जबरदस्ती न करता आवश्‍यकतेनुसार व रोटेशन पद्धतीने उपस्थित राहण्यास सांगावे. मुख्याध्यापकांनी "वर्क फ्रॉम होम'चे सर्वसमावेशक नियोजन करावे व त्याचा नियमितपणे आढावा घ्यावा. 
- विजयकुमार कुंभार, किणी हायस्कूल किणी 

कोरोना संसर्ग वाढतच असल्याने शासन व शिक्षणाधिकाऱ्यांनी आवश्‍यकता असेल तरच आठवड्यातून दोन दिवस शिक्षकांना शाळेत बोलवावे असे स्पष्ट आदेश दिलेले असूनही काही शाळा प्रमुख अयोग्य वापर करीत असतील तर संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई व्हावी. 
- राजेंद्र सूर्यवंशी, सहायक शिक्षक गोगवे हायस्कूल 

संपादन : प्रफुल्ल सुतार