
कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेचे महत्त्व नेहमीच कायम राहिले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच 2015 मध्ये महाविकास आघाडीसारख्या फॉर्म्युल्याला महापालिकेच्या राजकारणात आकार आला. चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने सत्तेत सहभागी होत परिवहन सभापतीपद आणि स्थायी समितीचे सदस्यत्व मिळविले, पण विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी महापालिका निवडणुकीची संधी साधण्याचा प्रयत्न क्षीरसागर आणि कार्यकर्त्यांकडून केला जाणार आहे.
काहीही झाले तरी या निवडणुकीत स्वबळावर 42 चे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. अर्थात विरोधकांशी लढण्याबरोबरच सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि लाथाळ्यांनाही सामोरे जावे लागणार आहे.
महापालिका राजकारणात शिवसेनेची निर्णायक भूमिका कायम राहिली आहे. 2010 आणि 2015 च्या निवडणुकीत या पक्षाने प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षणे कॉंग्रेसला मदत करण्याचे धोरण अवलंबिले होते. उत्तरेतील राजकारणात तडजोड झाली. नेमका हाच फटका त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बसला. कसबा बावडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, पण याच बालेकिल्ल्यात क्षीरसागरांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. आता महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या पराभवाचे हे उट्टे काढून प्रतिस्पर्धी कॉंग्रेससमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. राज्यातील सत्तेत महाविकास आघाडी म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी एकमेकाच्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी शहकटशहाचे राजकारण रंगेल, यात शंका नाही.
शिवसेनेलाही येथे अंतर्गत गटबाजीचे ग्रहण आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे विरुद्ध माजी आमदार राजेश क्षीरसागर असे सेनेतील वातावरण आहे. शहर शिवसेना म्हणून श्री. क्षीरसागर यांनी नेहमीच वरचष्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच शहरप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांना संधी देऊन पक्षातील विरोधकांवर मात करण्याचा प्रयत्न क्षीरसागर यांनी यापूर्वी केला आहे. आता महापालिका निवडणुकीची मदार क्षीरसागर आणि इंगवले या दोघांवर राहणार आहे. अंतर्गत बंडाळ्या आणि मतभेदाला बाजूला सारुन जागा निवडून आणाव्या लागणार आहे.
सभागृहात चार नगरसेवक
शिवसेनेचे 2015 मध्ये चार नगरसेवक निवडून आले. या काळात त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षणे कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मदत केली. विभागीय सभापतीपदाच्या एका निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीला मदत करण्याचे धोरण अवलंबिताच याची दखल पक्षाने घेत तत्कालीन गटनेते नियाज खान यांच्यावर दबाव आणला होता. त्यातून पक्षाच्या एका गटाने खान यांच्या घरावरही दगडफेक केली होती. शिवसेनेत गद्दारी चालणार नाही, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न होता.
परिवहन सभापतीपद पदरात
महापालिकेच्या सत्तेत त्यानंतरच्या काळात शिवसेनाही सहभागी झाली. त्यांनी परिवहन सभापतीपद आपल्याकडे घेतले. या पदावर नियाज खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण आणि प्रतिज्ञा उत्तुरे या पक्षाच्या चारही नगरसेवकांनी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. निवडून आले चार आणि चौघानांही सभापती होण्याची संधी मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.