
उमेदवाराची भूमिका घराघरांत जाण्यासाठी हायटेक प्रचार उपयुक्त ठरत असला तरी अजूनही ग्रामीण भागातून अंधश्रद्धेचा व्हायरस नष्ट व्हायला तयार नाही.
गडहिंग्लज (कोल्हापूर) : प्रत्येकाच्या हातातील ॲन्ड्राईड मोबाईलमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा सोपी झाली आहे. उमेदवाराची भूमिका घराघरांत जाण्यासाठी हायटेक प्रचार उपयुक्त ठरत असला तरी अजूनही ग्रामीण भागातून अंधश्रद्धेचा व्हायरस नष्ट व्हायला तयार नाही. प्रत्येक निवडणुकीत असा एक तरी प्रकार अनुभवयाला किंवा ऐकायला येतो.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा सुरू झाला आहे. पारंपारिक प्रचाराला फाटा दिला जात आहे. दशकभरात मोबाईल क्रांती होवून इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या विस्ताराचा लाभ प्रचारासाठी उठवला जात आहे. प्रत्यक्ष गाठी-भेटी आणि सोशल मिडीयाद्वारे उमेदवार, त्याची भूमिका या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात राहणे सोपे झाले आहे. मतदारांची नावे शोधून काढण्यासाठीही स्वतंत्र ॲप असून, त्याचा निवडणुकीत चांगला वापरही होत आहे.
हेही वाचा - पाटणेतील उच्च शिक्षीत तरूणाने फुलवली सेंद्रीय शेती -
काही वर्षापासून प्रचाराला हायटेकची झालर मिळाली असली तरी खेडोपाडी अंधश्रद्धेचे भूत हटायला तयार नाही. एकमेकांचे विरोधी उमेदवार त्यांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्यासाठी संबंधितांच्या घर परिसरात, प्रचाराच्या ठिकाणी, मतदान केंद्र, बुथजवळ करणी आणि भानामतीचे लिंबू, दोरा, सुया, डाबण असे साहित्य टाकले जातात. मुळात अशा प्रकारातून कोणी विजयी आणि पराभूतही होऊ शकत नाही. मुळात मतदार जागृत झाले आहेत.
उमेदवाराचा संपर्क, पाच वर्षात राबवलेले उपक्रम, भविष्यात गावासाठी तो काय करणार आहे, त्याचे व्हीजन याचा विचार करून मतदान करण्याचा कल वाढत आहे. गावपातळीवर नेहमीच्या चेहऱ्यापेक्षा चांगले पर्याय निर्माण होवू लागल्याने परिवर्तनाची लाटही पहायला मिळते. केवळ विरोधी उमेदवार व त्याच्या समर्थकांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्यासाठी अंधश्रद्धेसारख्या अशा चुकीच्या व समाज विघातक प्रवृत्तीला खतपाणी घालायचे हा प्रकार थांबायला हवा. याबाबत तरूणाईनेच आता जनजागृती हाती घेवून असे प्रकार करणाऱ्यांना कायदेशीर दंडुका दाखवण्याची गरज आहे.
हेही वाचा - प्रभाग रचनेतील बदल नगरसेवकांची उडविणार झोप: पाच ऐवजी दहा प्रभागांत बदल
"करणी, भानामतीचे प्रकार थोतांड आहेत. अशा गोष्टीतून कधीच जय-पराजय ठरत नसतो. खरे तर उमेदवाराने गावच्या विकासासाठी आपण काय करणार आहोत, याचा आराखडा ठेवून लोकांची मने जिंकावीत. परस्परविरोधी उमेदवारांना अंधश्रद्धेची भीती घालणे व मानसिक दबाव टाकणे चुकीचे आहे. अशा गोष्टीने राजकीय करिअर घडत नाही."
- प्रा. प्रकाश भोईटे, राज्य कार्यकारीणी सदस्य, अंनिस
संपादन - स्नेहल कदम