
बाजारभोगाव (कोल्हापूर) : कसबा बोरगाव (ता. पन्हाळा) येथून सहा मार्चपासून बेपत्ता असलेल्या छबूताई केरबा पाटील (वय ५८) यांचा सोन्याच्या दागिन्यांसाठी खून झाल्याचे आज निष्पन्न झाले.पन्हाळा पोलिसांनी याप्रकरणी प्रकाश सदाशिव कुंभार (वय ३५, रा. असंडोली, ता. गगनबावडा) याला अटक केली आहे. पन्हाळा न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. कर्जबाजारी असल्याने त्याने खून केल्याचे समोर येत आहे. याबाबतची फिर्याद संजय केरबा पाटील (रा. कसबा बोरगाव) यांनी दिली आहे.
याबाबत पन्हाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी
छबूताई दहा दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या सहा मार्चला कसबा बोरगाव-पोहाळे रस्त्याकडेच्या शेताला पाणी देण्यास गेल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास संशयित कुंभार रस्त्याशेजारी लघुशंकेसाठी थांबला असताना त्याने छबूताई पाटील यांच्या अंगावरील सुमारे सात तोळे दागिने पाहिले. दागिन्यांच्या लालसेने त्याने छबूताईना बोलण्यात गुंतवले. आपल्या दोन मुलांची लग्नं जमवायची असून, त्यांच्यासाठी मुली बघा, असा आग्रह त्यांनी त्याला केला.
मुलांच्या लग्नाबाबतची त्यांची अगतिकता हेरून कुंभार याने चला, तुम्हाला आताच मुली दाखवतो,’ असे सांगून त्यांना दुचाकीवर (एमएच ०९ एफ एस ०९६८) मागे बसवून घोटवडे (ता. पन्हाळा) गावच्या डोंगरात नेले. तेथे हातांनी गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून दुचाकीवरून मार्गेवाडी (ता. गगनबावडा) येथे घेऊन गेला. तेथील एका शेताजवळ कुंभी नदीकाठावरील झुडुपात मृतदेह भरलेले पोते टाकले. दरम्यान, नऊ मार्चला छबूताई बेपत्ता झाल्याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतरही कुंभार छबूताईंच्या घरी वारंवार येत होता.
महामार्ग पोलिस पथकातील तौसिफ मुल्ला यांना खबऱ्याकडून छबूताईंचा खून झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या सीडीआर अहवालानुसार छबूताईच्या मोबाईलवरून शेवटचा कॉल प्रकाशला झाला होता. शाहूवाडी उपविभागीय गुन्हा शोध पथक व महामार्ग पोलिस यांनी संयुक्तपणे तपास केला. पन्हाळा पोलिसांनी रविवारी रात्री प्रकाशच्या मुसक्या आवळल्या.
प्राथमिक चौकशीत त्याने घोटवडे येथे खून केल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली आहे. तथापि, खून केलेल्या जागांची दिशाभूल करणारी माहिती तो देत असल्याचे समजते.
करवीरचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळ्याचे निरीक्षक फडतरे, आत्माराम शिंदे, रवींद्र कांबळे, अंकुश शेलार आदी तपास करत आहेत.
साळवणमध्ये विकले दागिने
कुंभारने साळवणमधील एका सोनाराकडे विकलेले दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी संबंधित सराफावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
तो कॉल महत्त्वाचा ठरला...
छबूताईंना फोन क्रमांक सेव्ह करता येत नसल्याने कुंभारने त्यांच्या फोनवरून स्वतःचा नंबर डायल केला होता. कॉल डिटेल रिपोर्टवरून ही बाब उघड होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने हलवली आणि त्याला अटक झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.