
नळाला पाणी न आल्याने शिवाजीनगर व बोनगे गल्ली परिसरातील महिला रविवारी रात्री रस्त्यावर उतरल्या. अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी आपला मोर्चा फिल्टर हाऊसकडे वळवला.
इचलकरंजी : नळाला पाणी न आल्याने शिवाजीनगर व बोनगे गल्ली परिसरातील महिला रविवारी रात्री रस्त्यावर उतरल्या. अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी आपला मोर्चा फिल्टर हाऊसकडे वळवला. येथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरत रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरा असा मोर्चा निघाल्याने पोलिस व पालिका प्रशासनाची भंबेरी उडाली.
काही दिवसांपासून पालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन योग्य नसल्याने शहरात सर्व भागातून पालिकेबाबत नाराजीचा सूर वाढत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोन दिवसाआड नळाला पाणी सोडले जात होते. मात्र पंचगंगा उपसा केंद्रातील मोटार दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरातील पाणी पुरवठा करण्याचे नियोजन बिघडले. अशातच पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून उद्धट आणि खोटी माहिती दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण होत आहे.
शहरातील शिवाजीनगर व बोनगे गल्लीत रविवारी रात्री सहा दिवसांनी पाणी सोडले. मात्र अवघ्या दहा मिनिटात पाणी बंद केल्याने येथील संतप्त नागरिकांनी आपला मोर्चा शेजारील फिल्टर हाऊसकडे वळवला. यावेळी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत पाण्याचे योग्य नियोजन नसल्याचा जाब विचारला. मात्र कर्मचाऱ्यांकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.
याच दरम्यान, भाजपचे माजी शहराध्यक्ष शहाजी भोसले यांनी या ठिकाणी धाव घेतली. नगरसेवक मनोज साळुंखे व माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके यांनीही नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा पाणी सोडण्याच्या अटींवर सुमारे अर्धा तासाच्या या घडामोडीनंतर नागरिक घरी परतले.
संपादन - सचिन चराटी
Kolhapur