
मंदिर, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणाचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता.
कोल्हापूर - गारगोटी बस स्टॅंडसह आदमापूर मंदिरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स व दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला. टोळीतील चार संशयित महिलांना अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. अटक केलेल्या संशयित महिलांची नावे ः पूजा अर्जुन सकट (वय 30), अर्चना चंद्रकांत चौगुले (वय 21, दोघी निपाणी, बेळगाव), सुवर्णा विशाल जाधव (30) आणि मंदा सागर सकट (28, दोघी टाकाळा, कोल्हापूर) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती, मंदिर, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणाचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस नाईक किरण गावडे यांना चोरट्यांबाबत माहिती मिळाली. भुदरगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सीसीटीव्हीत कैद संशयित चार महिला गुजरीत चोरीचे सोने विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी गुजरीत आज सापळा लावला. तेथे आलेल्या चारही संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानी त्यांची नावे पूजा सकट, अर्चना चौगुले, सुवर्णा जाधव, मंदा सकट असल्याचे सांगितले. चौकशी केल्यानंतर त्यांनी गारगोटी एसटी स्टॅंड व आदमापूर येथील बाळूमामा मंदिर परिसरातून महिलांची पर्स व गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्या चौघींकडून 11 तोळे दागिने जप्त केले.
हे पण वाचा - भेट इंदिरा गांधींची; कोल्हापूरच्या नेत्यांच्या हिंदीनं सुटला धरणाचा प्रश्न
ही कारवाई पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक विजय गुरखे, कर्मचारी विजय कारंडे, श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर, किरण गावडे, प्रदीप पोवार, महिला कर्मचारी वैशाली पाटील, सुप्रिया कात्रट, सारिका मोटे आदींनी केली.
संपादन - धनाजी सुर्वे