VIDEO : महिला किसान दिन विशेष ; तीन मैत्रिणींनी कसली कंबर , गोठा प्रकल्पात मारला नंबर

Women Farmers Day Special there friend herd of 20 cows was set up story by nandini narewadi
Women Farmers Day Special there friend herd of 20 cows was set up story by nandini narewadi

कोल्हापूर : लाली, श्रावणी, राधा, डॉली, शुभ्रा, पूनम ही नावे मुलींची नाहीत; तर गायींची आहेत. मृणाल कुलकर्णी, सरोज जिल्हेदार व संगीता मराठे या तिघीपैकी दोघी नोकरदार, तर एक गृहिणी. तिघींच्या संवादातून आदर्श गोठा पद्धतीचा व्यवसाय फुलून आला. आणि तिघीही प्रत्येक गायीकडे माया, ममता व वात्सल्याचा भाव घेऊन गोसंगोपनात गुंतल्या आहेत. एकावेळी नोकरी, घर आणि गोसंगोपन अशी तिहेरी जबाबदाऱ्या लीलया पेलत त्यांनी स्वअर्थार्जनाला बळ दिले आहे. त्यांचे हे वात्सल्यरूपी गोसंगोपन गुरुवारी (ता. १५) महिला किसान दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.


फुलेवाडी व मंगळवार पेठेत राहणाऱ्या या तिघींनी पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे २० गायींचा गोठा उभारला आहे. ही तीन कुटुंबे वेगवेगळ्या क्षेत्रांतील. सगळेच उच्चशिक्षित. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणारे. एखाद्या सदस्याचा अपवाद सोडला तर शेती, गोपालन म्हणजे काय हेच माहिती नाही. पण, तीन वर्षांपासून नोकरीत असणारे हे हात धारा काढत आहेत. देशी गायीच्या दुधाबरोबर विविध पदार्थांची विक्री करून शेतीपूरक क्षेत्रात करिअर घडवत आहेत.

जिल्हेदार, कुलकर्णी, मराठे या तीन कुटुंबांनी एकत्र येत देशी गोपालनाबरोबरच उपदार्थांची विक्री करीत हा उद्योग फुलविला आहे. विशेष म्हणजे तिन्ही कुटुंबातील मैत्रिणींच्या पुढाकारानेच हा व्यवसाय प्रगतिपथावर गेला आहे.सुरवातीला तीन कुटुंबांनी संयुक्तपणे काही भांडवल एकत्र करून गायींची खरेदी केली. अडीच एकर क्षेत्र १० वर्षांसाठी भाड्याने घेऊन त्यात गोठ्यासह चाऱ्याची व्यवस्था केली. अडीच एकर क्षेत्रात १५ गुंठ्यावर गायींचा गोठा आहे. यात साडेतीन गुंठ्याचे शेड आहे. गोठ्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड केली जाते. यात हत्ती गवत, मका शाळूंची लागवड केली जाते. सुरवातीला कोकण गिड्ड या जातीच्या देशी गायी आणल्या होत्या. 


कुटुंबीयांचीही साथ
२० गायींचा पसारा असला तरी गोठ्यात कोणताही बाहेरचा कामगार नाही. फक्त तीन कुटुंबांतील सदस्यच आपल्याला जमेल तसा वेळ देतात. सकाळच्या वेळी सरोज व संगीता या गोठ्यात जातात. लवकर जाऊन शेणमूत्र स्वच्छता करणे, चाऱ्याचे व्यवस्थापन करण्यासह धारा काढतात. सायंकाळी सचिन जिल्हेदार व संतोष मराठे हे जबाबदारी सांभाळतात. मृणाल व प्रसाद कुलकर्णी दुधाचे पॅकिंग व मार्केटिंगची जबाबदारी घेतात. दुधाचे तूप करणे, गोमूत्र अर्क बनविणे, जीवामृत, शेणी बनविण्याची जबाबदारी संगीता यांनी घेतली आहे.

आम्ही तीन मैत्रिणींनी देशातील प्रत्येक जातीची एक गाय तरी असावी, असा आग्रह ठेवला. यामुळे विविध जातीच्या गायींचे संकलन केले. सध्या गोठ्यात वासरासह २५ गायी आहेत. कोकणगिड्ड, खिलार, गीर साहिवाल, लाल कंधार, कांकरेज, देवणी, थारपाकर आदी जातींचा समावेश आहे. 
- सरोज, संगीता आणि मृणाल

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com