esakal | ऑनलाईन-ऑफलाईन नोंदणीने इचलकरंजीत कामगारांची तारांबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Workers Disturbed In Ichalkaranji  Kolhapur Marathi News

शहरातील हजारो स्थलांतरित परप्रांतीय कामगारांची मुळ गावी जाण्यासाठी ऑनलाईनबरोबर ऑफलाईन नोंदणी करावी लागल्याने तारांबळ उडाली आहे. त्यामुळे सर्व कामगार मूळ गावी जाण्याकरिता आपले प्रस्ताव जमा करण्यासाठी राजीव गांधी भवन येथे प्रचंड गर्दी करत आहेत. एकीकडे ही होणारी गर्दी आटोक्‍यात आणणे पालिका प्रशासनाला नाकेनऊ आले आहे, तर दुसरीकडे कामगार सकाळपासूनच मोठ्‌या प्रमाणात गर्दी करत आहे.

ऑनलाईन-ऑफलाईन नोंदणीने इचलकरंजीत कामगारांची तारांबळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी, ता. 8 : शहरातील हजारो स्थलांतरित परप्रांतीय कामगारांची मुळ गावी जाण्यासाठी ऑनलाईनबरोबर ऑफलाईन नोंदणी करावी लागल्याने तारांबळ उडाली आहे. त्यामुळे सर्व कामगार मूळ गावी जाण्याकरिता आपले प्रस्ताव जमा करण्यासाठी राजीव गांधी भवन येथे प्रचंड गर्दी करत आहेत. एकीकडे ही होणारी गर्दी आटोक्‍यात आणणे पालिका प्रशासनाला नाकेनऊ आले आहे, तर दुसरीकडे कामगार सकाळपासूनच मोठ्‌या प्रमाणात गर्दी करत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. सध्या 1 हजार 700 स्थलांतरित कामगारांचे प्रस्ताव पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवले आहेत. 

शासनाने परराज्यातील व जिल्ह्यातील कामगारांना मूळ गावी जाण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार इचलकरंजी शहरातील सुमारे 15 हजार अधिक स्थलांतर कामगारांनी ऑनलाईन नोंदणी केली. ही ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून अशा कामगारांची यादी जाहीर केली जाणार होती. परंतु सध्या या कामगारांना नोंदणी करूनही आपले ऑफलाईन प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे जमा करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ते हजारो कामगार स्वतःची संपुर्ण माहिती असलेला फॉर्म, वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्‍स. असा प्रस्ताव जमा करण्यासाठी राजीव गांधी भवन येथे प्रचंड गर्दी करत आहेत. 

राजस्थानसाठी एक हजार प्रस्ताव 
उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी असल्याने गर्दीवर नियंत्रण आणणे पालिकेला अशक्‍य होत आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. प्रस्ताव जमा करून या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी नियोजन करायचे की सोशल डिस्टन्स ठेवत गर्दीवर नियंत्रण आणायचे हा प्रश्‍न पालिका प्रशासनाला पडला आहे. राजस्थानमधील एक हजार कामगारांची प्रस्ताव पालिकेने तयार केले असून मूळ गावी जाण्यासाठी पास उपलब्ध करून दिले जात आहेत.