esakal | ऑनलाईन वाचन संस्कृती बहरतेय; पीडीएफबाबत घ्या काळजी!
sakal

बोलून बातमी शोधा

World Book and Copyright Day Special Online reading culture

‘ई बुक’ हे पुस्तकांचे आधुनिक रूप आजच्या तरुणाईला आणि ‘टेक्‍नोसॅव्ही’ मंडळींना खुणावत असून, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीची वाचन संस्कृती बहरत असल्याचे दिसून येते. आजचा दिवस हा जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्‍सपिअर यांचा स्मृतीदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

ऑनलाईन वाचन संस्कृती बहरतेय; पीडीएफबाबत घ्या काळजी!

sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर - आधुनिक जीवनशैलीमध्ये पारंपरिक गोष्टीत बदल होऊन तिचे नवीन रूप समोर येते. तसेच काहीसे पुस्तकांच्या बाबतीतही झाले आहे. ‘ई बुक’ हे पुस्तकांचे आधुनिक रूप आजच्या तरुणाईला आणि ‘टेक्‍नोसॅव्ही’ मंडळींना खुणावत असून, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीची वाचन संस्कृती बहरत असल्याचे दिसून येते. आजचा दिवस हा जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्‍सपिअर यांचा स्मृतीदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.


त्यानिमित्ताने वाचन संस्कृतीचा आढावा घेतला असता ऑनलाईन पुस्तके वाचणे तरुणाईला भावत असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम सकारात्मक असून ज्येष्ठांसोबतच तरुणाईही वाचनाचा छंद जपत असल्याचे या क्षेत्रातील मंडळींनी सांगितले. व्हॉटस्‌ॲप, फेसबुक आणि समाजमाध्यमांच्या उपलब्धतेनंतर वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी ओरड होताना दिसते. मात्र असे प्रत्यक्षात होत नसुन फक्त वाचनाची पद्धत, माध्यम आणि जागा बदलत आहे. 

सुरवातीला दिवाळी अंकात कथा, कविता, वैचारिक लिखाण करणारे नवोदित लेखकांची संख्याही अधिक आहे. अशा दर्जेदार लिखाण करणाऱ्या नवोदित लेखकांचे पुस्तके प्रकाशन करून प्रकाशन संस्था त्यांना प्रोत्साहनही देताना दिसतात. प्रिंटसोबत त्यांची ई बुक्‍स व ऑडिओ बुक्‍सही तयार केल्या जातात. शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या पोर्टलला दरदिवशी भेट देणाऱ्या वाचक, विद्यार्थ्यांची संख्या सहाशे ते सातशे आहे. शासनाच्या नॅशनल डिजिटल लायब्ररीलाही भेट देऊन आवडते पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्याही मोठी आहे. 


किंमत कमी, डिजिटलला संधी
प्रिंट केलेल्या पुस्तकापेक्षा ई बुक्‍सची किंमत कमी आहे. अभियांत्रिकी तसेच अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची ई बुक्‍स उपलब्ध आहेत. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉपवर सहज उपलब्ध असलेल्या या पुस्तकांना विद्यार्थ्यांसह शिक्षक, वाचकांचीही पसंती मिळत आहे.

अन्यथा कारवाई होऊ शकते
सध्या गाजलेल्या पुस्तकांच्या पीडीएफ व्हॉटस्‌ॲप व सोशल मिडीयावरून फॉरवर्ड होताना दिसतात. मात्र या पुस्तकांचे कॉपीराईट आहे का ? हे तपासले जात नाही. अशी पुस्तके न वाचता किंडलसारख्या ई बुक्‍स उपलब्ध करून देणाऱ्या पोर्टलवरून सब्सक्राईब केल्या पाहिजेत. अन्यथा सायबर गुन्हेगारी अंतर्गत कारवाईही होऊ शकते. 

सध्या जे नवोदित लेखक सकस लिहितात त्यांचे हस्तलिखित पाहून पुस्तक प्रकाशित केले जाते. आमच्याकडे सध्या बाराशे ई बुक्‍स आहेत. त्यांनाही मागणी आहे. प्रिंट पुस्तके वाचण्याची ज्यांना सवय आहे ते पुस्तके विकत घेतात. मात्र, ज्यांना कमी किमतीत व स्मार्ट फोन उपलब्ध आहे ते ई बुक्‍स वाचण्यावर भर देतात. एकूणच वाचनसंख्या वाढल्याचे दिसते. 
- अनिल मेहता, मेहता पब्लििशंग हाऊस

वाचन संस्कृती दिवसेंदिवस बहरताना दिसते. प्रिंट माध्यम थोड्या प्रमाणात कमी झाले असले तरी त्यांचा वाचकवर्ग टिकून आहे. ऑनलाईन वाचकसंख्याही मोठी आहे. जुन्या व प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यासोबतच नवोदित लेखकांच्या पुस्तकांनाही मागणी आहे.
- डॉ. नमिता खोत, संचालिका, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्र