world suicide prevention day special story in kolhapur
world suicide prevention day special story in kolhapur

World Suicide Prevention Day : आत्महत्येचे पाऊल उचलणाऱ्यांना येथे दिला जातो धीर

कोल्हापूर : त्या पती-पत्नींना दोन मुले. काही कारणांनी पतीची नोकरी गेली. नोकरी गेल्याच्या नैराश्‍यातून त्याला दारूचे व्यसन लागले. यातून घरी वादाचे प्रसंग सुरू झाले. पत्नीला मारहाण नित्याचीच झाली. यातून त्या नैराश्‍यात जाऊ लागल्या. 
एक दिवस पतीने मुलांवरही हात उगारला. हे मात्र तिला सहन झाले नाही आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या शारीरिकदृष्ट्या बऱ्या झाल्या पण नैराश्‍य कायम राहिले. सीपीआरच्या मानसोपचार विभागाने त्यांचे समुपदेशन करून त्यांना नव्याने जगण्याची उमेद दिली. हे झाले एक प्रातिनिधीक उदाहरण. सीपीआरच्या मानसोपचार विभागात दररोज सरासरी पाच ते सात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींची जगण्याची इच्छाशक्ती वाढवली जाते.


व्यसनांच्या नशेत, किरकोळ कारणांवरून, आर्थिक समस्या, घरगुती वादविवाद किंवा प्रेमभंगातून काहीजण आत्महत्येच्या प्रयत्नाचे पाऊल उचलतात. संयमाचा अभाव असणे, राग पटकन येणे, ताण सहन करण्याची क्षमता कमी असणे तसेच नकार पचविण्याची क्षमता नसणे, अशा व्यक्ती आत्महत्येला लगेच प्रवृत्त होतात. 


बहुतांश जणांना सीपीआरमध्ये दाखल केले जाते. यापैकी ९५ टक्के व्यक्तींचा जीव वाचवून त्यांना जगण्याची नवी उमेद देण्यात सीपीआरच्या मानसोपचार विभागाला यश मिळाले आहे. 
सध्या कोरोनाच्या संकटात समाजात नकारात्मक गोष्टी घडत असताना मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी हा विभाग प्रयत्न करतो आहे. आताही नोकरी गमावलेल्या किंवा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व्यक्ती नैराश्‍यात जातात. चिडचीड करू लागतात. कोरोना होईल का या भितीनेही ग्रासतात. अशांचे समुपदेशन करून त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. 

आत्महत्येला प्रवृत्त होण्याची कारणे

- नातेसंबधातील गुंतागुंत      

-भावनिक, आर्थिक असुरक्षितता

-अतिरिक्त अपेक्षेचा भंग    

-नोकरीतील असुरक्षितता

-कोरोना होण्याची भिती,

-कौंटुबिक काळजी

-मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढणारी संशयी वृत्ती

समुपदेशनानंतर पुन्हा नैराश्‍य नाही
योग्य काळात समुपदेशन मिळाले, रागावर नियंत्रण कसे ठेवावे आणि त्याला योग्य दिशा कशी द्यायची, याची माहिती अशा व्यक्तींना दिल्यानंतर त्यांना नैराश्‍यातून किंवा त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा नवा मार्गच दाखवला जातो. भावनिक, आर्थिक तसेच नातेसंबंधातील गुंतागुंती सोडवता न आल्याने, अतिरेक विचार केल्याने जीव देण्याचा विचार मनात आलेल्या व्यक्तींचे समुपदेशन केल्यानंतर पुन्हा त्या व्यक्ती शक्‍यतो नैराश्‍यात जात नाहीत.

कोरोनापूर्वीच्या काळात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सरासरी पाच ते सात व्यक्ती सीपीआरमध्ये दाखल होत. त्यांना योग्य उपचारासोबत समुपदेशनातून त्यांच्या जगण्याची उमेद वाढते. ९५ टक्के व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या बऱ्या झालेल्या आहेत. कोरोना काळातही हे प्रमाण तसेच आहे. 
- डॉ. स्नेहा हर्षे,  मानसोपचार तज्ज्ञ.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com