esakal | सलग दुसऱ्या वर्षी जोतिबा चैत्र यात्रा रद्द; व्यापारी, दुकानदारांना आर्थिक फटका
sakal

बोलून बातमी शोधा

this year festival of jyotiba god cancelled due to corona in kolhapur

यंदाची चैत्र यात्रा रद्द झाल्याने कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 

सलग दुसऱ्या वर्षी जोतिबा चैत्र यात्रा रद्द; व्यापारी, दुकानदारांना आर्थिक फटका

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, यंदाही जोतिबा डोंगरावरील व्यापारी, दुकानदार किरकोळ विक्रेत्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. यंदाची चैत्र यात्रा रद्द झाल्याने कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 

जोतिबा चैत्र यात्रेत दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. यामुळे येथील नारळ, गुलाल, खोबरे व मेवा - मिठाई, दवणा याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. व्यापारी दरवर्षी यात्रेआधीच डोंगरावर दाखल होतात. दरम्यान गेल्या वर्षीही चैत्र यात्रा रद्द झाली होती. त्यामुळे या परिसरातील व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थ, पुजारी यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. जवळपास आठ महिने पूर्ण जोतिबा डोंगर भाविकांसाठी बंद होता. यादरम्यान अनेकांनी रोजगार करून उदनिर्वाह केला.

यंदाही चैत्र यात्रा रद्द झाल्याने येथील ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आता त्यांना सेवाभावी संस्था व शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. डोंगरावरील व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थ, पुजारी यांच्याकडून वीज बील माफ तसेच विविध कर्जांतून सवलती मिळाव्या अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

हेही वाचा - चंद्रकांत पाटील यांनी केंद्रात जाऊन लशीसाठी प्रयत्न करावेत

"गेल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले. दुकानात भरून ठेवलेला गुलाल-खोबरे मेवामिठाई हा माल पडून राहीला. आठ महिने मंदिर बंद असल्याने आमचे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. यंदा खेटे बंद झाल्यामुळे ही मोठा फटका बसला आहे."

- गजानन फुटाणे व्यापारी, किराणा व मेवा मिठाई, जोतिबा डोंगर 

 
"आमचा नारळ, मेवा मिठाई व्यापार असून आम्ही गेल्या वर्षी यात्रेच्या आधीच सर्व माल भरला होता. अचानक यात्रा रद्द झाली आणि आमचा तो माल पडून राहिल्याने खराब झाला. त्यामुळे आर्थिक फटका बसून नुकसान झाले. अशी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. आता यंदा यात्रा रद्द झाल्यामुळे व्यापारांना मोठा त्रास होणार आहे."
 
- दिनकर चौगुले, व्यापारी, नारळ व मेवा मिठाई, जोतिबा डोंगर