चांगलं काम करूनही द्यावी लागतेय लाच

राजेश मोरे
गुरुवार, 30 जुलै 2020

होमगार्ड म्हणून तीन वर्षे उत्कृष्ट सेवा सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोघा होमगार्डवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. अनिकेत संताजी सरनाईक (वय 23, रा. शाहू कॉलनी, मंगळवार पेठ) व नीलेश विठ्ठल सुतार (26, टेंबलाईवाडी) अशी त्या संशयिताची नावे असल्याचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

कोल्हापूर  ः होमगार्ड म्हणून तीन वर्षे उत्कृष्ट सेवा सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोघा होमगार्डवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. अनिकेत संताजी सरनाईक (वय 23, रा. शाहू कॉलनी, मंगळवार पेठ) व नीलेश विठ्ठल सुतार (26, टेंबलाईवाडी) अशी त्या संशयिताची नावे असल्याचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

होमगार्डमध्ये तीन वर्षे उत्कृष्ट सेवा सर्टिफिकेट हे पुनर्नियुक्तीला आवश्‍यक असते. त्याचबरोबर पोलिस भरतीमध्ये प्रमाणपत्र मिळालेल्या होमगार्डना विशेष कोटा आहे. तक्रारदार हे होमगार्ड आहेत. त्यांना तीन वर्षे उत्कृष्ट सेवा सर्टिफिकेट व पुनर्नियुक्तीसाठीचा फॉर्म भरून कागदपत्रे सादर करण्यास त्यांना कार्यालयाने कळवले होते. त्याबाबत तक्रारदारांनी कार्यालयात अर्ज सादर केला होता. दरम्यान, जुना राजवाडा येथील होमगार्ड कार्यालयात काम करणारे होमगार्ड संशयित अनिकेत सरनाईक व नीलेश सुतार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी त्यांना तीन वर्षे उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी 17 जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. याची त्याच दिवशी विभागाने पडताळणी करून खात्री केली. यानंतर विभागाने सापळा रचला; पण संशयित सुतारने तक्रारदारांना सोमवारी (ता. 20) रोजी जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे भेटण्यास बोलवले. त्या दिवशीही विभागाने सापळा रचला; पण त्या दिवशीही सरनाईक व सुतार यानी पैसे स्वीकारले नाहीत; पण त्या दोघांनी लाचेची मागणी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, कर्मचारी मनोज खोत, शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, मयुर देसाई यांनी केली.

लाचेच्या मागणी प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. यात सहभागी असणाऱ्या सर्व घटकांची चौकशी करून कारवाई केली जाईल. तसेच या प्रमाणपत्राबाबत अन्य कोणाकडे पैशाची मागणी केली असेल तर संबधितांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. 
आदिनाथ बुधवंत (पोलिस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You have to pay a bribe even after doing a good job