काळजी नको, उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळणार ऑनलाईन 

युवराज पाटील  
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेण्यासाठी यावे लागू नये, यासाठी राज्य मंडळाने ऑनलाईन स्वरूपात सुविधा देण्याची तयारी केली आहे.

कोल्हापूर : कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेण्यासाठी यावे लागू नये, यासाठी राज्य मंडळाने ऑनलाईन स्वरूपात सुविधा देण्याची तयारी केली आहे. यासाठी स्वतंत्रपणे संकेतस्थळ दिले जाईल. दहावी, तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. कोरोनामुळे परीक्षांचे निकाल लांबणीवर पडले आहेत. 

काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिली जात आहे. पूर्वी पुनर्तपासणीची बोर्डात सुविधा होती. विद्यार्थ्याने अर्ज केल्यानंतर पोस्टाद्वारे गुणात बदल झाला की नाही, याची माहिती कळविली जात होती. विद्यार्थ्यांनी त्यांनीच लिहिलेली उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी का दिली जाऊ नये, असा प्रश्‍न उपस्थित झाला. सध्या फोटोकॉपीसाठी (उत्तरपत्रिकेची झेरॉक्‍स), पन्नास रुपये, उत्तरपत्रिकेसाठी प्रत्येकी तीनशे रुपये शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना दिल्या जातात. व्हेरिफिकेशन, रिचेकिंग असे दोन प्रकार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या गुणाविषयी शंका असल्यास आणि त्याने संबंधित विषय शिक्षकाला उत्तरपत्रिका दाखवून त्याच्या गुणात वाढ होऊ शकते, अशी शक्‍यता वाटल्यास उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते. 

कोरोनाचे संकट नजीकच्या काळात कमी होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे निकालानंतरच्या उत्तरपत्रिकेच्या प्रक्रियेसाठी ऑनलाईन सुविधा देण्याचा विचार केला आहे. संकेतस्थळावर त्यासंबंधीचा अर्ज उपलब्ध होईल. दहावी-बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे एटीएम कार्ड असत नाही, त्यामुळे पैसे कसे भरून घ्यायचे, यावर चर्चा सुरू आहे. दुर्गम भागात मोबाईल रेंज असू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज करणे कठीण होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागीय मंडळात मदत केंद्र उभारण्याचा विचार आहे. 

निकाल ऑनलाईन जाहीर होणार... 
राज्यातील नऊही विभागीय मंडळांच्या कामकाजाची पद्धत कोरोनामुळे बदलली आहे. मुंबई-पुण्यात स्थिती अजूनही आटोक्‍यात येत नसल्याचे चित्र आहे. दोन्ही परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर होईल. नंतर विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे उत्तरपत्रिका दिल्या जातील. किमान महिनाभर प्रक्रिया चालते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you will get a photocopy of the answer sheet online