मला घर द्या, मला घर द्या ; तरुणाच्या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ   

मल्लिकार्जुन मुगळी
Tuesday, 3 November 2020

संबंधित तरुणाने कणबर्गी येथील निवासी संकुलात घुसखोरी केली आहे

बेळगाव : काहीही करा पण घर द्या, अशी मागणी करत एका तरुणाने महापालिकेच्या आश्रय विभागातच ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी (ता.३) सकाळी हा प्रकार घडला, त्यामुळे हे आंदोलन पाहण्यासाठी आश्रय विभागातील कर्मचार्यांनीच गर्दी केली. आश्रय विभागातील अधिकारी छाया कोटी यांच्यासमोर बसून त्या तरुणाने केवळ 'मला घर द्या, मला घर द्या' हे एकच पालुपद सुरू केले. 

संबंधित तरुणाने कणबर्गी येथील निवासी संकुलात घुसखोरी केली आहे. त्यामुळे महापालिकेने त्याला सदनिका सोडण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्या तरुणाने थेट महापालिका कार्यालय गाठले. आश्रय विभागात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी त्याने तेथील अधिकारी छाया कोटी यांच्या नावे चिट्ठी लिहून जीवाचे बरे वाईट करून घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे अधिकारी कोटी घाबरल्या. कोटी यांच्या मते या तरुणाची कणबर्गी येथील निवासी संकुलासाठी लाभार्थी म्हणून निवड झालेली नाही. तो एकटाच आहे, त्याच्या कुटुंबात कोणीच नाही. झोपडपट्टी विकास योजनेतून बांधलेल्या संकुलातील सदनिकेत त्याने अतिक्रमण केले आहे. सदनिका सोडण्यास सांगितल्याने त्याने आंदोलन सुरू केले आहे. पण तेथील सदनिकांचे लाभार्थी निवडण्यासाठी एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेत जे पात्र ठरतील त्यांनाच सदनिका मिळते. पण त्या तरुणाने पिच्छा न सोडल्याने कोटी त्रस्त झाल्या. त्या तरुणाबाबत आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला. पण दुपारपर्यंत तो तरुण आश्रय विभागात बसूनच होता. मला घर द्या हे त्याचे पालुपद सुरूच होते. झोपडपट्टी विकास योजनेतून शहरात श्रीनगर व कणबर्गी या दोन ठिकाणी निवासी संकुल बांधण्यात आले आहे. त्यातील सदनिका वितारणावरून २०१९ साली गोंधळ झाला होता. वितरण होण्याआधीच काहींनी तेथे घुसखोरी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी आर विशाल यांनी तो विषय मार्गी लावला होता. पण अजूनही काही सदनिका तेथे शिल्लक आहेत. त्या सदनिकांचे लवकरच वितरण केले जाणार आहे. त्यासाठी आधीच पालिकेकडे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातून लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार आहेत.

हे पण वाचाराष्ट्रवादीच्या उमेदवारीवर ठरणार भाजपची रणणीती 

या तरुणाचा अर्ज पालिकेकडे नाही, शिवाय तो बेळगावचा रहिवाशी नाही. त्यामुळे त्याला सदनिका मिळणार नाही. श्रीनगर व वंटमुरी कॉलनीतील झोपडपट्टीतील कुटुंबानाच तेथील सदनिका द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे त्या तरुणाचे आंदोलन यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. तरीही त्या तरुणाने आपली जिद्द सोडलेली नाही. घर मिळेपर्यंत आंदोलन करणारच असा इशाराच त्या तरुणाने आश्रय विभागाला दिला आहे. मंगळवारचे त्याचे आंदोलनही लक्ष्यवेधी ठरले.

हे पण वाचा 'चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही'  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy protest in belgaum Municipal Shelter Department