कोल्हापूर : इराणी खंणीत तरुण बुडाला ; अग्निशामक दलाची शोधमोहीम

राजेश मोरे 
Thursday, 19 November 2020

घटनास्थळी पोलिसांना एक मोटारसायकल मिळून आली

कोल्हापूर - रंकाळा येथील इराणी खणीत एक तरूण सायंकाळी बुडाला. त्याला नागरिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यांच्याकडून शोध मोहीम राबविण्यात आली. घटनास्थळी पोलिसांना एक मोटारसायकल मिळून आली. त्यावरून त्याचे नातेवाईक शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती, इराणी खणीजवळ एक तरूण बसला होता. शेजारीच त्याने मोटारसायकल उभी केली होती. हा तरूण मातीवरून घसरत पाण्यात पडला. हा प्रकार येथे फिरायला येणाऱ्या मुलांसह नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण दोरी किंवा काठी वेळेत न मिळाल्याने त्यांना यश आले नाही. त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. घटनास्थळी अग्निशामक दलासह जुना राजवाडा पोलिसही दाखल झाले. त्यांनी शोध मोहीम सुरू केली. पण विसर्जित मूर्तीमुळे त्यांच्या शोध मोहीमेवर मर्यादा आल्या. त्यात अंधार पडल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली.

हे पण वाचा - वृद्ध महिलांना गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात

घटनास्थळी पोलिसांना संबधित तरूणाची मोटारसायकल व टोपी पोलिसांना मिळून आली. ही मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याच्या क्रमांकावरून पोलिसांकडून संबधित तरूणाचे नाव व नातेवाईक शोधण्याचे काम सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man drowned in Iranian mine kolhapur