खुषखबर! आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी पार्क मैदान पुढील वर्षापासून सज्ज

Park Stadium
Park Stadium

सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान) मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जानुसार मैदान बांधणीचे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरनंतर सुरवातीला या मैदानावर रणजी सामने व त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा आनंद सोलापूरकरांना घेता येणार आहे. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पार्क मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिका व जिल्हा क्रिकेट असोसिएशन एकत्र येऊन हा प्रकल्प राबवत आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे मैदानाची उभारणी व पुढील आयोजनाच्या संदर्भाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत नियोजन करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्‍युरेटर व रणजीपटू पांडुरंग साळगावकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी हे मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उभारले जावे या दृष्टीने विशेष लक्ष घातले आहे. स्थानिक क्रिकेटपटू के. टी. पवार, रणजीपटू नितीन देशमुख, रणजीपटू रोहित जाधव, उदय डोके हे मैदानास भेट देऊन कामाची पाहणी करत असतात. क्रीडा क्षेत्रातील प्रकाश भुतडा, दिलीप बच्चुवार, मुकुंद जाधव, संजय बडवे, चंद्रकांत रेंबर्सू यांच्यासह क्रीडाप्रेमी लक्ष घालत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मानकानुसार या मैदानाचा पाया तयार करून मातीचे थर अंथरले गेले आहेत. मैदानावरून पाणी वाहून जाण्यासाठी विशेष भूमिगत पाणी निचरा यंत्रणा देखील केली जात आहे. 

मैदानावर असणार "एवढ्या' खेळपट्ट्या 
या मैदानावर एकूण 19 खेळपट्ट्या (पिचेस) तयार केल्या जात आहेत. नियमित सरावासाठी आठ खेळपट्ट्या असतील. मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी 11 खेळपट्ट्या उपलब्ध होतील. मैदानावर उत्कृष्ट दर्जाच्या पॅव्हेलियनची उभारणी केली जात आहे. हे काम नोव्हेंबर अखेर पूर्णत्वाला जाणार आहे. हे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तयार व्हावे यासाठी सुरवातीला त्यावर जिल्हास्तरीय, प्रथमश्रेणी व रणजी सामने खेळवले जाणार आहेत. या प्रकल्पावर सल्लागार म्हणून भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक लालचंद रजपूत यांना घेतले आहे. 

आंतरराष्ट्रीय क्‍युरेटर तथा रणजीपटू पांडुरंग साळगावकर म्हणाले, सोलापूरमध्ये होणारे पार्क मैदानाचे काम अतिशय दर्जेदार झाले आहे. हे मैदान पुढील काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी एक उत्कृष्ट मैदान ठरणार आहे. 

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता तपन डंके म्हणाले, पहिल्या टप्प्यात धावपट्टी व मैदानाची बांधणी, पॅव्हेलियन, ड्रेसिंग रूम, पंच व मीडिया कक्ष बांधणीची कामे केली जात आहेत. त्यासाठी सात कोटी 61 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू म्हणाले, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका व संघटना पदाधिकारी, क्रिकेटपटू व क्रीडाप्रेमी हे पार्क मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. 

सोलापूर स्पोर्टस पॅव्हेलियनचे अध्यक्ष प्रकाश भुतडा म्हणाले, सोलापूर शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर यावे यासाठी हे मैदान अगदी उत्कृष्ट ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com