शासकीय पॉलटेक्‍निक कॉलेजेस आउट ऑफ रेंज! प्रवेशासाठी उडाली विद्यार्थ्यांची धांदल 

mobile network
mobile network

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धांदल उडाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील बहुतेक शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजेसचे संपर्क क्रमांक बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी चौकशी करत आहेत. फोनवर विविध कोर्सविषयी माहिती जाणून घेत आहेत. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी माहिती घेत आहेत. परंतु, या सर्व प्रक्रियांमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक कॉलेजेसमधील संपर्क नंबरच बंद असल्याची बाब समोर आली आहे. राज्यातील शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजेस जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. तसेच कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असल्यामुळे खेडेगावातील मुले शहरात जाण्यासाठी घाबरत आहेत. काही शहरांत ई-पास लागत आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी पॉलिटेक्‍निक कॉलेजला फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. परंतु महाराष्ट्रातील बहुतेक शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजेसनी त्यांच्या वेबसाइटवर दिलेले फोन नंबर बंद ठेवले आहेत. काहींचे फोन लागत नाहीत, काहींचे फोन "इनव्हॅलिड' झालेत, काहींच्या फोनला नेटवर्क नसते, काहींचे फोन स्वीचऑफ असतात, तर काहींचे फोन लागलेच तर स्वीकारले जात नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

गव्हर्नमेंट कॉलेजेस एडमिशन संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची पावले खासगी पॉलिटेक्‍निक कॉलेजकडे वळू लागली आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नाशिक अशा सहा विभागांत सुमारे 50 शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजेस आहेत. यांची प्रवेश क्षमता 13 हजार 126 इतकी आहे. गतवर्षी यातील केवळ सहा हजार 494 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे तब्बल 50 टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. एकीकडे पैशावाचून गरीब घरातील विद्यार्थी इतर शिक्षण घेत आहेत, काहीजण शिक्षण सोडून देत आहेत तर सरकारने मोफत पुरविलेल्या सरकारी महाविद्यालयांतील शिक्षणाच्या जागा रिकाम्या राहात आहेत. त्या जागेचा गरीब कुटुंबातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना कसा लाभ मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. चालू शैक्षणिक वर्षात राज्यात पॉलिटेक्‍निकच्या एकूण जागा खासगी व सरकारी पॉलिटेक्‍निक महाविद्यालय मिळून एक लाख 17 हजार 824 आहेत. यात 20 ऑगस्टपर्यंत केवळ 10 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नावनोंदणी केली आहे. 

पॉलिटेक्‍निकला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डीटीईच्या वेबसाइटला रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना फिजिकल स्क्रुटिनी आणि ई-स्क्रुटिनी असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. डीटीईने काही कॉलेजवर एफसी सेंटरद्वारे विद्यार्थ्यांकडून रजिस्ट्रेशन करून घेण्याची सोय केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना एफसी सेंटरला भेट देणे शक्‍य नाही त्यांच्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची सोय केलेली आहे. रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट आहे. यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करणे, पाहिजे त्या कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरणे अशी प्रक्रिया आहे. ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरताना ज्या कॉलेजला प्रवेश पाहिजे त्या कॉलेजचा कोड आणि जो कोर्स पाहिजे त्याचा कोड ऑनलाइन भरावा लागतो. 

रोपळे बुद्रूक येथील मोटिव्हेशनल स्पीकर अँड करिअर कॉन्सिलर भारत व्यवहारे म्हणाले, राज्यातील बऱ्याच शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजेसनी फोन नंबर बंद ठेवले आहेत. त्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणाचा लाभ घेता यात नाही. 

पालक बाळासाहेब खपाले म्हणाले, आमच्या मुलाला दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळाले आहेत म्हणून आम्ही शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजला ऍडमिशन घेण्याचे ठरवले. मात्र अनेक शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजचे फोन बंद असल्यामुळे त्याला इयत्ता अकरावीत प्रवेश घ्यावा लागला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com