लॅाकडाऊन `यांच्या`साठी संकट नव्हे सुवर्णसंधी

लॅाकडाऊन `यांच्या`साठी संकट नव्हे सुवर्णसंधी

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॅाकडाऊनचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार नागरिकांनी आपापल्या घरात बसून राहणे हे अपेक्षित होते. मात्र सोलापुरातील पूर्व विभागात राहणाऱ्या लोकांसाठी लॅाकडाऊन हे संकट नव्हे तर सुवर्णसंधी ठरली असल्याचे दिसून येत आहे. गल्लीच्या सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त असल्याने अगदी बंदोबस्तामध्ये हे लोक एखाद्या गल्लीच्या आतल्या भागात बसून लुडो गेम आणि पत्ते कुटत आहेत. 

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखादे आवाहन केले की थाळ्या वाजवणारे आणि टाळ्या वाजवणारे लोक सर्वांनी पाहिले आहेत किंबहुना सर्व थरातील लोकांनी त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. जनता कर्फ्यु, दिवे लावणीचा कार्यक्रम ही त्यास अपवाद नव्हता, एवढेच काय आज लॉक डाऊनचा 21 वा दिवसही शांततेने आणि संयमाने पाळला जात आहे आणि पुढे किमान 20 दिवस तो पाळण्याची मानसिक तयारी सर्वसामान्य जनेतेने केलेली आहे . आपणच आपले रक्षक म्हणून म्हणा की कोरोनाच्या दहशती मुळे म्हणा सर्वजण आपापल्या घरात आहेत.

पहिला कोरोना रुग्ण सापडला आणि....
सोलापुरात पहिला कोरोना रुग्ण सापडला आणि संपूर्ण परिस्थिती पालटली आहे.  शहरातील प्रभावित भाग आणि परिसरातील 3 किलोमीटरमध्ये येणारा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. त्यांनतर सोलापुरातील विशेषतः पुर्व भागातील गल्ल्या आपणहून सील करण्याची मोहीम अनेकांनी हाती घेतली आहे.  छोट्या-मोठ्या गल्ल्यांच्या तोंडावर मिळेल ते साहित्य, दोरा, वासे, लाकूड, बांबू आडवे लावून छोट्या गल्ल्या तर सोडाच पण कांही मुख्य रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

पूर्व भागातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी 
पुर्व भागातील भारत रत्न इंदिरा नगर, भारत नगर, एकात्मिक जीवन विकास नगर, माधव नगर, कुमठा नाका परिसर, आदर्श नगर, लक्ष्मी नारायण टॉकीज परिसर, वेणुगोपाल नगर, आनंद नगर, स्वागत नगर, ताई चौक, निलम - श्रमजिवी नगर भागात मोठ्या प्रमाणात असे स्वयंप्रेरणेने केलेले जनता बॅरीकेटींग दिसून येत आहेत. वरवर हे जागरूक सोलापुरकरांचे कार्य दिसत असले तरी यापैकी कांही भागातील लोकांनी याचा गैरफायदा घेण्यास सुरूवात केली आहे. या ‘जनता बॅरीकेटींग’ च्या रक्षणाखाली अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या घोळक्यातून मोबाईलवरील लुडो आणि तीन पत्तीसारखे जुगारी प्रकार ‘टाईमपास’च्या नांवाखाली सुरू झाले आहेत. त्याचसोबत कट्टया-कट्यांवर गर्दी जमू लागली आहे. त्यामुळे हे लाॅकडाऊन त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली आहे.

जनता बॅरीकेटींगमुळे अडचणी
या जनता बॅरीकेटींगमुळे ‘कोरोना’च्या प्रार्दुभावापासून नक्कीच नागरिकांचे रक्षण होणार आहे आणि होत आहे मात्र या बॅरिकेटींगमुळे महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांना देखील परिसरात शिरण्यास, कचरा गोळा करण्यास मज्जाव झाला आहे. त्यासोबतच अत्यावश्यक सेवेत येणार्‍या गॅस वितरणालाही या जनता बॅरीकेटींगमुळे फटका बसला असून नागरिकांना बॅरीकेटींग पर्यंत पायी चालत जावून गॅस टाक्या घेण्यास भाग पाडले जात आहे. भाजीपाल्याला गर्दी होवू नये या उद्देशाने शहर पोलीस आयुक्तांनी हातगाडी वाल्यांना फिरून भाजी विकण्यास दिलेल्या परवनागीलाही या जनता बॅरिकेटींगमुळे फटका बसत आहे. त्याचवेळी एखाद्या तातडीच्या प्रसंगी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांना या यातून बाहेर काढणे अवघड होणार आहे. कालच शहरातील कांही ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले आहेत अशा दुर्दैवी प्रसंगी प्रशासनाला त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com