esakal | पॅन्टमध्ये सापडली 14.5 इंची तलवार 
sakal

बोलून बातमी शोधा

A 14 inch sword found in the pants of a youth in Solapur

अंगझडतीमध्ये पॅन्टच्या मध्ये मागील उजव्या बाजूस खोवलेली 14.5 इंचाची पाते असलेली तलवार सापडली. मुंबई पोलिस कायदा, शस्त्रबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

पॅन्टमध्ये सापडली 14.5 इंची तलवार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना 29 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता सुनीलनगर येथील देशी दारू दुकानासमोर घडली. 
पोलिस कर्मचारी संजय गुरव यांनी फिर्याद दिली आहे.

आकाश ऊर्फ हंसराज अंबादास व्हट्टे (वय 29, रा. कर्णिकनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस कर्मचारी गुरव आणि त्यांचे सहकारी रात्रगस्तीवर होते. आरोपी व्हट्टे हा संशयास्पद स्थितीत थांबलेला दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी पाठलाग करून, गराडा घालून पकडले. अंगझडतीमध्ये पॅन्टच्या मध्ये मागील उजव्या बाजूस खोवलेली 14.5 इंचाची पाते असलेली तलवार सापडली. मुंबई पोलिस कायदा, शस्त्रबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

पूनम पाटेकर खून खटल्यात 
पतीसह पाच जणांची निर्दोष मुक्‍तता 

अंजनगाव (खे.) (ता. माढा) येथे पूनम शेखर पाटेकर या विवाहितेचा खून केल्याच्या आरोपावरून तिचा पती शेखर बाबासाहेब पाटेकर, सासू शोभा, सासरा बाबासाहेब, दीर तन्मय व पतीचा मामा सुनील चौगुले या सर्व आरोपींची अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी निर्दोष मुक्‍तता केली. प्रेमप्रकरणातून पूनम आणि शेखर या दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. दोघेही पुणे येथे राहत होते. घटनेपूर्वी 15 दिवस अगोदर ते गावी राहण्यास आले होते. पतीसह इतर आरोपी हे माहेरवरून हुंडा व सोने घेऊन ये असे म्हणून मारहाण करतात, असे पूनमने वडिलांना फोनवर कळविले होते. त्यानंतर 15 जून 2017 रोजी तिचा मृतदेह विहिरीत मिळून आला. तिच्या डोक्‍याला जखम होती. तिचे वडील गौतम गाडेकर यांनी पतीसह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेदिवशी तिचा पती शेखर, सासू शोभा व दीर तन्मय हे सोलापुरात वैद्यकीय उपचारासाठी गेल्याचे बचाव पक्षाच्यातर्फे सांगण्यात आले. पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. या प्रकरणी आरोपीतर्फे ऍड. धनंजय माने, ऍड. जयदीप माने, ऍड. शरद झालटे, ऍड. विकास मोटे, ऍड. सिद्धेश्‍वर खंडागळे तर सरकारतर्फे ऍड. प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले. 

मारहाण, धक्काबुक्कीप्रकरणी चौघांवर गुन्हा 
लहान मुलास दमदाटी करून मारहाण केली. जाब विचारल्यानंतर धक्काबुक्की केली. याप्रकरणी अरविंद शिवाजी शिंदे, आशा चव्हाण, आतिश शिंदे, सखूबाई शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली आहे. शर्मिला विटकर (वय 33, रा. रविवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. विटकर यांचा मुलगा जेवणानंतर घराबाहेर फिरत होता. तेव्हा आरोपी अरविंद याने दारूच्या नशेत मुलाला जवळ बोलावले. त्याने नकार दिल्याने मारायची धमकी दिली. गच्ची पकडली. मुलाने त्याला विरोध केला. मारहाणीसाठी बळाचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी शर्मिला विटकर आणि त्यांच्या बहिणीने आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. तेव्हा सर्व आरोपींनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. मुलगा कॉलेजला जातो, त्याला भविष्यात त्रास होऊ नये म्हणून पोलिसांत फिर्याद दिल्याचे म्हटले आहे. 

पैशाच्या कारणावरून मारहाण 
दारू पिल्यानंतर पैशाच्या कारणावरून मारहाण केली. याप्रकरणी अजित कांबळे, मल्लिकार्जुन शहापुरे, मलेश मदगिरी, मनोज कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता मड्डी वस्ती परिसरात घडली. हसीना युसूफ जमादार (वय 50, रा. मड्डी वस्ती, बुद्ध मंदिर, भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मुलगा सलमान यास मल्लिकार्जुन शहापुरे याने माल लावून येऊ, असे म्हणून सोबत नेले. सलमानकडील 500 रुपये घेऊन दारू पिली. पैशाची मागणी केल्यानंतर आरोपींनी सलमान यास मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या जमादार यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

जागेच्या कारणावरून दगडाने केली मारहाण 
जागेच्या कारणावरून दगडाने मारहाण केल्याप्रकरणी विठ्ठल चन्नप्पा विटकर (रा. भारतरत्न इंदिरानगर, रुक्‍मिणी अपार्टमेंट, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता विजयनगर येथे घडली. दत्तात्रय शिवलाल विटकर (वय 38, भारतरत्न इंदिरानगर, गेंट्याल थिएटरमागे, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यात घरजागेच्या कारणावरून वाद चालू आहे. फिर्यादी विटकर हे त्यांच्या आजीला भेटायला गेले होते. आजीला भेटून दुचाकीवरून घराकडे जाताना चुलता विठ्ठल विटकर याने थोडे थांब बोलायचे आहे... असे म्हणून घरजागेच्या कारणावरून शिवीगाळ करून जमिनीवर पडलेला दगड घेऊन डोक्‍यात मारून जखमी केले.