सहा दिवसात 1584 लिटर हातभट्टी जप्त 

प्रमोद बोडके
Monday, 30 March 2020

जिल्ह्यात व शहरात दारू विक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग लक्ष ठेवून आहे. ज्या ठिकाणी दारू विक्री केली जात असेल तर त्या संदर्भातील तक्रार नागरिकांनी पोलिसांना व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करावी. 
- रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. एक ते दोन दिवसांचा ड्राय डे सहन करणाऱ्या तळीरामांना सध्याचा कालावधी महाकठीण जात आहे. लॉकडाऊनमध्ये दारू उपलब्ध होत नसल्याने तळिरामांची अस्वस्थता वाढत आहे. दारू, मावा आणि तंबाखूच्या शोधात अनेक जण शहरात गल्लोगल्ली, वाड्यावस्त्यांवर भटकत असल्याचे समोर येऊ लागले आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून 1 हजार 584 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. 
हेही वाचा - आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या, कर्नाटकातील मजूर महिलांची तहसीलदारांकडे आर्जव 
या कालावधीत सर्व प्रकारच्या दारूची सर्व प्रकारची दुकाने बंद करण्यात आली आहेत. 24 ते 29 मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने 65 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातून 1 हजार 584 लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या कालावधी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कठोर कारवाई केली जात आहे. आतापर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत 43.6 लिटर देशी दारू, 10.5 लिटर बिअर जप्त करण्यात आली आहे. मळी आणि पाणी मिश्रित रसायन 71 हजार 750 लिटर जप्त करण्यात आले आहे. 19 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आतापर्यंत 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1584 liters of gourmet alcohol seized in six days