सोलापूर जिल्ह्यात एनडीआरएफचे 18 जवान दाखल 

प्रमोद बोडके
Thursday, 15 October 2020

जिल्ह्यातील नद्यांना प्रचंड महापूर 
सोलापूर जिल्ह्यातील नीरा, भीमा, सीना, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांना सध्या प्रचंड पाणी आले आहे. सीना, भीमा, नीरा या नद्यांवरील धरणांमधून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये महापूर आला आहे. येथील नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शहर व जिल्ह्यातील ओढे, नदी नाल्यांना प्रचंड पाणी आले आहे. त्यातच उजनी धरणातून भीमा नदीत, नीरा नदीतून भीमा नदीत, अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरणातून बोरी नदीत आणि सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना महापूराचा मोठा फटका बसला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील या प्रमुख नद्यांसह भोगावती, नागझरी नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. जिल्ह्यातील नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महापूराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात एनडीआरएफचे (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) 18 जवान सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर व बार्शी या तालुक्‍यातील गावांमध्ये एनडीआरएफ, महसूल प्रशासन, पोलिस यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात येत आहे. 

आज सकाळी पासून जवळपास 30 ते 40 जणांचे प्राण वाचविण्यात जिल्हा प्रशासन व एनडीआरएफला यश आले आहे. बार्शी तालुक्‍यातील बचावकार्य जवळपास पूर्ण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या मार्गावरील नदी, ओढे व नाल्यांना पाणी आले आहे, ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. महापूराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर कामाला लागला आहे. महसूल प्रशासनाची यंत्रणा पूरग्रस्त गावांमध्ये दाखल झाली आहे. बार्शी तालुक्‍यातील सासुरे येथे युवकाने महापूराच्या धोक्‍यात तब्बल 12 तास झाडावर आश्रय घेतला. त्या युवकाला आज सकाळी सहा वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले. बार्शी तालुक्‍यातील मुंगशी येथील युवकाला पहाटे 5 च्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 NDRF personnel deployed in Solapur district

टॉपिकस
Topic Tags: