'ते' 20 विद्यार्थी सुखरुप : जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

  • कलबुर्गीतील केंद्रीय विद्यापीठातील 20 विद्यार्थी सुखरुप 
  • उद्या (सोमवारी) त्यांना त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था 
  • चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, नगर, पुणे, पालघरमधील आहेत ते विद्यार्थी 
  • कर्नाटक सरकारने सुट्‌टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी मागितली होती मदत 
  • कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत : आरोग्य पथकाकडून तपासणी 

सोलापूर : कर्नाटकातील कलबुर्गी येथील केंद्रीय विद्यापीठातील 20 विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली होती. त्यामुळे त्यांना सोलापुरीाल केगाव येथील विलगीकरण केंद्रात निगराणीखाली ठेवले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसून त्यांना उद्या (सोमवारी) सुखरुपपणे घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

हेही नक्‍की वाचा : कोरोनाबाधितांची संख्या आता 32 झाली 

कलबुर्गी येथील केंद्रीय विद्यापीठात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्नाटक सरकारने कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुट्‌टी जाहीर केली आहे. त्यामुळे बहूतांश विद्यार्थी आपल्या गावी निघून गेले. महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या गावी जाण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली होती. त्यानुसार रविवारी (ता. 15) सकाळी त्यांना सोलापुरात आणण्यात आले होते. त्यांची व्यवस्था केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आल्याचेही श्री. शंभरकर यांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय विद्यापीठ गुलबर्गा पासून 23 किलोमीटर दूर आहे. या विद्यार्थ्यांची आज वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने तपासणी केली त्यांना कसल्याही प्रकारची कोरोना संसर्गाची लक्षणे नाहीत. तसेच ते परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरीकांच्या संपर्कात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची कोंडी ! वस्तीगृहे, ग्रंथालयांना कुलूप 

जिल्हानिहाय विद्यार्थी 
सोलापुरात आणलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पाच विद्यार्थी चंद्रपूर, सहा विद्यार्थी वर्धा, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन असे विदर्भातील 15 विद्यार्थी आहेत. तर नगर आणि पालघर जिल्ह्यांतील प्रत्येकी एक आणि पुणे जिल्ह्यातील तीन विद्यार्थी आहेत. विदर्भातील विद्यार्थ्याना उद्या(सोमवारी) सकाळी घरी पाठविण्यात येणार आहे. पुणे, नगर व पालघर येथील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला असून तेही उद्याच येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 students safely information of District Collector Shambharkar