
मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाच्या संकटामुळे शहर व ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराअभावी घरात बसून राहावे लागले. उत्पन्नाचे साधन असलेला रोजगार बुडाला. अशा परिस्थितीत कोरोनाशी सामना करताना जगण्याचे संकट तालुक्यातील जवळपास 15 हजार 670 एपीएल कार्डधारकांतील 60 हजार 60 लोकांसमोर आहे. किमान त्यांना या कालावधीत रेशनचे धान्य उपलब्ध करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
हेही वाचा - वीज गेल्या द्या मिस कॉल
वंचित कार्डधारकांना धान्य कधी मिळणार?
दुष्काळी तालुक्यातील जनतेचा उदरनिर्वाह चार कारखाने व त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांबरोबर खरीप व जिरायत शेतीतील रोजगारावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कोरोना रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर केले. नागरिकांना घरी बसून राहण्याच्या सूचना दिल्यामुळे दैनंदिन कामाचा रोजगार बुडाला. त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर देखील त्याचा परिणाम झाल्यामुळे त्यांच्यासमोर पोटाला खायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला. परंतु प्रशासनाने मात्र अंत्योदय, अन्नपूर्णा, प्राधान्य आणि बीपीएल या कार्डधारकांना रेशनच्या माध्यमातून गहू, तांदूळ देण्याची व्यवस्था केली. परंतु तालुक्यातील 15 हजार 670 कुटुंब अजूनही वंचित असून त्यामधील 60 हजार 60 लोकांसमोर अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक, शहर व तालुक्यात काहींनी नव्याने शिधापत्रिका घेतल्या तर काही विभक्त झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर कोरोना साथीत रोजगार थांबल्यामुळे खाण्याचे वांदे निर्माण झाले आहेत. अशातच प्रशासनाने सर्वच कार्डधारकांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पण सध्या तालुक्यामध्ये एपीएल वगळून सर्वांना रेशनचे धान्य उपलब्ध झाले. त्यामध्ये अन्नपूर्णा 73, अंत्योदय 3693, अन्नसुरक्षा 24989 मधील काही कार्डधारक ऑनलाइन नसल्याने त्यांना धान्य मिळत नाही. संचारबंदीमुळे ऑनलाइनसाठी घराबाहेर पडता येत नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. तालुक्यातील एपीएल कार्डधारक लाभार्थीसमोर कोरोनाच्या संकटामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे वंचित कार्डधारकांना धान्य कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे.
ऑनलाईन नसलेल्या वंचित कार्डधारकांनी धान्य न नेल्यामुळे कार्ड बंद झाले, त्यांना तत्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे. शिवाय 2014 पासून एपीएल धारकांसाठी देखील या संकटसमयी धान्य उपलब्ध करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे त्यांना लवकरच दिलासा मिळेल.
- भारत भालके,
आमदार
अंत्यादय, प्राधान्य, बीपीएलमधील धान्य न नेलेल्या ऑफलाइन कार्डधारकांनी कार्डात समावेश असलेल्यांचे आधार कार्ड झेरॉक्स गाव समिती किंवा स्वस्त धान्य दुकानदाराकडे दिल्यास ते ऍक्टिव्ह करून त्यांना धान्य उपलब्ध करून दिले जाईल.
- स्वप्नील रावडे,
तहसीलदार
कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता, रोजगार थांबल्यामुळे एपीएल कार्डधारकांनाही रेशनचे धान्य उपलब्ध करावे. त्यांच्यासमोरही जगण्याचा प्रश्न आहे.
- अंबादास ऐवळे,
एपीएल कार्डधारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.