
रविवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वनापरसी जिल्ह्यातील कोत्ताकोटा गावाजवळ त्यांच्या भरधाव वाहनाने एका पुलाच्या संरक्षक कठड्याला धडकून भीषण अपघात झाला.
सोलापूर : देवदर्शनाला तिरुमला येथे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापुरातील दोन कुटुंबीयांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार, तिघे गंभीर जखमी तर सातजण किरकोळ झाले. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास तेलंगणामधील कोत्ताकोटा गावाजवळ घडली.
येथील प्रसिद्ध गणिताचे शिक्षक यल्लप्पा पेंटप्पा धुळम व कुनी कुटुंबातील 13 जण खासगी वाहनातून रविवारी (ता. 16) पहाटे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघाले होते. रविवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वनापरसी जिल्ह्यातील कोत्ताकोटा गावाजवळ त्यांच्या भरधाव वाहनाने एका पुलाच्या संरक्षक कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. यात स्वप्ना राजू कुनी (वय 25), शारदा कृष्णाहरी कुनी (वय 45, दोघे रा. जुने विडी घरकुल, सोलापूर) व दत्तात्रय पेंटप्पा धुळम (वय 47, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) हे तिघे जागीच ठार झाले. तर यल्लप्पा पेंटप्पा धुळम (वय 62, रा. जोडभावी पेठ), कृष्णाहरी कुनी (वय 50) व शिवा असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. गंभीर जखमींना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात राजू कृष्णाहरी कुनी (वय 25), भक्ती राजू कुनी (वय 3), वम्सीकृष्णा राजू कुनी (वय 5, रा. जुने विडी घरकुल), शैलेश यल्लप्पा धुळम (वय 20), श्रेयश यल्लप्पा धुळम (वय 18), रमा यल्लप्पा धुळम (वय 50) व प्रियांका यल्लप्पा धुळम (वय 22, रा. जोडभावी पेठ) हे जखमी झाले आहेत. जखमींवर कोत्ताकोटा येथे उपचार करण्यात आले आहेत.
यल्लप्पा पेंटप्पा धुळम हे सोलापुरातील गणिताचे प्रसिद्ध शिक्षक आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे धुळम व कुनी परिवार तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. चालकाने अतिवेगाने व हयगयीने वाहन चालवून कोत्ताकोटा गावाजवळील पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.