पंचनामा सुरू असतानाच धक्का देऊन टीपर पळवला

प्रशांत काळे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

कोंढारे तानाजी चौक येथे गेले असता पोलिस उपनिरीक्षक अमोल ननावरे हा टीपर पोलिस ठाण्यात घेऊन गेले असल्याचे समजले. त्यांनी पोलिस ठाणे गाठले. ननवरे यांनी कोंढारे यांच्या ताब्यात टीपर दिला व पुढील कारवाई करा असे सांगितले. पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या टीपरचा कोंढारे पंचनामा करीत असताना टीपर चालकाने वाहन सुरु केले.

बार्शी (सोलापूर) : रॉयल्टी नसताना अवैधरित्या मुरुमाची वहातूक करणारा टीपर पोलिसांनी पकडून पोलिस ठाण्यात आणला. तहसील कार्यालयाचे अधिकारी पंचनामा करीत असताना त्यांना धक्का देऊन टीपर पळवून नेला. याप्रकरणी शहर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टीपर मालक सागर दादा मोरे (रा. साकत) व चालक अशी संशयीत गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान पोलिस ठाणेसमोर घडली.

याबाबत गौणखनिज लिपीक उदय कोंढारे यांनी फिर्याद दिली. तानाजी चौकात मुरुमाने भरलेला टीपर (एम.एच.13 सी.यु. 4522) उभा असल्याची माहिती नायब तहसीलदार एस. एम. मुंढे यांना मिळाली होती. त्यांनी गौण खनिज लिपीक उदय कोंढारे यांना फोन करुन माहिती देऊन कारवाई करण्याचे सांगितले. 
कोंढारे तानाजी चौक येथे गेले असता पोलिस उपनिरीक्षक अमोल ननावरे हा टीपर पोलिस ठाण्यात घेऊन गेले असल्याचे समजले. त्यांनी पोलिस ठाणे गाठले. ननवरे यांनी कोंढारे यांच्या ताब्यात टीपर दिला व पुढील कारवाई करा असे सांगितले. पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या टीपरचा कोंढारे पंचनामा करीत असताना टीपर चालकाने वाहन सुरु केले. 
चालकास टीपर बंद करण्यास सांगितले पण त्याने बंद केला नाही. टीपरची चावीवर चढून काढण्याचा प्रयत्न केला असता चालकाने झटापट करुन ढकलून दिले. टीपर भरधाव वेगात चालवून निघून गेला. त्यावेळी तिथे उभा असलेला सागर दादा मोरे याने मीच टीपरचा मालक असून टीपर शासकीय गोदामात नेऊन ठेव असे चालकाला सांगितल्याचे कोंढारे यांना सांगितले पण टीपर गोदामाकडे फिरकलाच नाही.असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी महाराष्ट्र जमिन महसूल,पर्यावरण सरंक्षण अधिनियम,शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणासही अटक केलेली नाह.तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जायपात्रे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acne transported illegally in Barshi taluka