कोविड चाचणीचा आग्रह धरणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 29 मे 2020

रिक्त जागांची संगणकीय यादी होणार 
शहरातील कोणत्या खासगी रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत याची माहिती तातडीने संगणकीय पद्धतीने अपडेट केली जाईल. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या सोईच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची सोय होईल. तसेच जे हॉस्पिटल कोरोना टेस्टचा आग्रह धरत असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश लवकरच काढण्यात येईल, असेही श्री. शंभरकर यांनी या वेळी स्पष्ट केले. 

सोलापूर : रुग्णालयात दाखल करून घेतेवेळी कोरोना किंवा कोविडची चाचणीचा आग्रह धरणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध तातडीने कडक कारवाई करा. अशा प्रकरणात माझा भाऊ असला तरी कारवाई करा, असा आदेश पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत श्री. भरणे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. शहरातील रुग्णालयांवर जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, केवळ दिखावा केला जातो, अशी तक्रार करतानाचा गेल्या दोन-तीन दिवसांत शहरात झालेल्या घटनांचा आढावाच पालकमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला. पायाला जखम झाली तरी कोरोनाची टेस्ट करायला सांगितले जात आहे, हे उदाहरणासह सांगितल्यावर पालकमंत्र्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. असे प्रकार होत असतील तर ते योग्य नाही. केवळ छोट्या रुग्णालयांवर कारवाई करण्यापेक्षा चुकीच्या पद्धतीने भूमिका घेणाऱ्या मोठ्या रुग्णालयांवरही कारवाई करा. कोविडची चाचणी झाल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश देऊ नये, असे कोणत्याही नियमात नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चाचणीचा आग्रह धरणाऱ्या खासगी रुग्णालयांविरुद्ध बेधडक कारवाई करावी, असे सांगितले. 

सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र त्याचवेळी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सक्षमपणे काम करीत असल्याचेही सांगितले. प्रशासनाच्या काही चुका झाल्या हे मान्य, पण प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास राबत आहे याचाही विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. शहरातील दवाखान्यात रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. हे प्रकार तातडीने थांबायला हवेत, असेही श्री. भरणे म्हणाले. 

 
रिक्त जागांची संगणकीय यादी होणार 
शहरातील कोणत्या खासगी रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत याची माहिती तातडीने संगणकीय पद्धतीने अपडेट केली जाईल. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या सोईच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची सोय होईल. तसेच जे हॉस्पिटल कोरोना टेस्टचा आग्रह धरत असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश लवकरच काढण्यात येईल, असेही श्री. शंभरकर यांनी या वेळी स्पष्ट केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on hospitals insisting on covid test