#Lockdown : पैसे मागितल्याची तक्रार; पोलिस अधिकाऱ्यावर निलंबानाची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

आसरा चौक परिसरातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याची तक्रार आयुक्त शिंदे यांच्याकडे आली होती. याप्रकरणाची चौकशी करून निलंबनाची कारवाई केल्याचे आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

सोलापूर : विजापूर नाका पोलिस ठाणे अंकित औद्योगिक पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदी कालावधीत कारवाई न करण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार दिवसे यांच्या विरोधात आली होती, अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी दिली. 

दिवसे यांच्या हद्दीत आसरा चौक, होटगी रोडचा परिसर होता. संचारबंदी कालावधीत त्यांनी गस्त घालून सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही केली होती. आसरा चौक परिसरातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याची तक्रार आयुक्त शिंदे यांच्याकडे आली होती. याप्रकरणाची चौकशी करून निलंबनाची कारवाई केल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

संचारबंदीत बाहेर जाऊ नका, पोलिसांचा आहे वॉच 
संचारबंदी कालावधीत वाहन घेऊन घराबाहेर जाणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच आहे. अशा लोकांची वाहने जप्त करून कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. कोरोना पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन केले आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी आहे. असे असताना काही लोक वेगवेगळी कारणे सांगून वाहन घेऊन घराबाहेर फिरत आहेत. रस्त्यावर चौकाचौकात नाकांबदी आहेच, शिवाय पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरासाठी चार विशेष पथकाची स्थापना केली असून या पथकाकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येत आहे. वाहन घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जात असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. आपल्या परिसरात संचारबंदी कालावधीत नागरिक बाहेर फिरत असतील तर तत्काळ नियंत्रण कक्षातील 02172744600 या दूरध्वनी क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.  

अत्यावश्‍यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवेशिवाय अन्य कोण घराबाहेर फिरत असेल तर त्यांचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action for suspension of a police officer