शिक्षक समायोजनावेळी शिक्षक आमदार कुठे होते ; अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा सवाल

भारत नागणे
Sunday, 22 November 2020

श्री. सुतार म्हणाले की, राज्य शासनाने 2016-17 साली विद्यार्थी पटसंख्या पडताळणी मोहिम राबवली होती. यामध्ये सोलापूरसह पंढरपूर तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाले होते. त्यावेळी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गाजला होता.

पंढरपूर (सोलापूर) : सेवक संचामध्ये पटसंख्या कमी झाल्याने पंढरपूर तालुक्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त झाले होते. यामध्ये काही संस्था चालकांनी अन्यायकारक पध्दतीने शिक्षकांना अतिरिक्त केले होेते. त्यावेळी न्याय मागण्यासाठी आम्ही शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या घराचे उंबरे झिजवले. परंतु  न्याय मिळाला नाही. निवडणूक आल्यानंतरच त्यांना शिक्षकांबद्दलचे प्रेम उफाळून आले आहे. समायोजनावेळी शिक्षक आमदार कुठे होते, असा सवाल अतिरिक्त समायोजित शिक्षक व विश्वकर्मा पांचाळ सुतार सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांनी विचारला आहे.

अतिरिक्त शिक्षकांची येथे बैठक झाली. त्यामध्ये श्री. सुतार यांनी अतिरिक्त शिक्षकांवर कशा पध्दतीने संस्था चालक आणि आमदारांनी अन्याय केला याचा पाढाच वाचून दाखवला. यावेळी बोलताना श्री. सुतार म्हणाले की, राज्य शासनाने 2016-17 साली विद्यार्थी पटसंख्या पडताळणी मोहिम राबवली होती. यामध्ये सोलापूरसह पंढरपूर तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाले होते. त्यावेळी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गाजला होता.

दरम्यान तालुक्यातील काही शाळांनी सेवा ज्येष्ठा डावलून शिक्षकांना अतिरिक्त केले होते. यामध्ये पळशी येथील शरदचंद्रजी पवार शिक्षण संस्थेतील 12  अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला होता. येथील 12 शिक्षकांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्याकडे न्याय मागितला होता. परंतु या शिक्षकांना त्यांनी न्याय मिळवून दिला नाही. मागील सहा वर्षापूर्वी आम्ही सर्व शिक्षकांनी त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते. परंतु त्यांनीच आमच्या समस्या आणि अडचणींकडे दुर्लक्ष केले.

सेवा ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करुन ती शासनाला पाठवली जाते. यामध्ये अनेक शिक्षण संस्था चालकांनी आपल्या नात्यागोत्यातील आणि जवळच्या लोकांचे हित पाहिले. आमच्यासारख्या गरीब आणि प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांवर मात्र स्थलांतरित होण्याची वेळ आली.

याच दरम्यान अनेक शिक्षकांना 10 महिने पगार देखील मिळाला नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आणि कुटुंबाची आर्थिक ओढाताण झाली. अशा संकट प्रसंगी शिक्षक परिषदेकडे आम्ही न्याय मागितला. त्यांनी तात्काळ अतिरिक्त शिक्षकांच्या अडचणी सोडवल्या. त्यामुळे अतिरिक्त झालेले सर्वजण  शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचेही श्री. सुतार यांनी सांगितले.

बैठकीला सरगर डी.डी, राजमाने व्ही.आर, महाडिक एन.एस., हिल्लाळ बी.के., पाटील एन,जी., कुंभार एल.एम, गळवे एम.जी, सावंत एस.एल, खिलारे के, एम, जाधव एस.पी. आदींसह शिक्षक उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional teachers have been unfairly treated by institution drivers and MLAs