गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवावरही कोरोनाचे विघ्न ! व्यावसायिकांनाही बसतोय फटका

हुकूम मुलाणी
Sunday, 18 October 2020

वरात्र काळात सांस्कृतिक कला सादर करणाऱ्या कलाकारांना देखील याचा मोठा फटका बसल्याने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची वेळ आली आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबरोबर नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यानंतर दुर्गा ज्योती विना दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून लॉकडाऊन केले. सोशल डिस्टंन्स ठेवत मोठ्या सार्वजनिक धार्मिक सणावर शासनाने बंदी घातली. अशा परिस्थितीत गणपती उत्सव, रमजान ईद, बकरी ईद, मोहरम हे सण साधेपणाने साजरे करण्यात आले. या धार्मिक कार्यातील अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली. नवरात्र उत्सवामध्ये मंगळवेढा शहरातील देखावे हे राज्यभरात पाहण्यासारखे असतात. या काळात किराणा व्यावसायिक, कापड व्यावसायिक, फुले व्यावसायिक, मंडप -लाईट डेकोरेशन, बनियन पेंटर, यांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. 

या उत्सवामध्ये काही सजीव व ऐतिहासिक देखावे देखील पाहण्यासारखे असतात. हे देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टन्सचा फज्जा उडणार, म्हणून प्रशासनाने या धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यावर बंदी घातल्यामुळे मंदिरातच दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली.

तुळजापूर, कोल्हापूर सप्तश्रृंगी आदी ठिकाणावरून ज्योती धावत वाजत-गाजत आणण्याची परंपरा यंदा खंडित झाल्यामुळे तरूणाईच्या उत्साहावर विरजण पडले. नवरात्र काळात सांस्कृतिक कला सादर करणाऱ्या कलाकारांना देखील याचा मोठा फटका बसल्याने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची वेळ आली आहे. घरोघरी सायंकाळच्या सत्रात घटस्थापना करण्यात आली.

मंगळवेढ्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे म्हणाले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सर्वच धार्मिक सण साधेपणाने साजरे करून सहकार्य केले. त्याप्रमाणे नवरात्र उत्सव देखील साधेपणाने साजरे करून कोरोनाची वाढणारी साखळी रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration has appealed for peaceful celebration of Navratri in Mangalwedha village