तुम्हाला उद्योजक व्हायचंय! लॉकडाउननंतर आहेत अनेक संधी : वाचा सविस्तर 

Garment Industry
Garment Industry

सोलापूर : रोटी, कपडा आणि मकान या जीवनाच्या आवश्‍यक गरजांमध्ये कपड्यांची गरज खूप मोठी आहे. गारमेंट व्यवसायात शर्ट, पॅंट, शाळा-महाविद्यालयांसाठी गणवेश, किड्‌स गारमेंटिंग यांना कायमस्वरूपी मोठी मागणी असते. आता कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्ह्‌ज आदी सुरक्षा साधनांची गरज वाढणार असून, यांच्या निर्मितीसाठी उद्योजकांनी एकत्र आल्यास त्यांना गारमेंट क्‍लस्टरद्वारे मोठी संधी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. 

ग्लोबल बुद्धिस्ट कॉग्रिगेशनच्या फेसबुक लाइव्हमध्ये "लॉकडाउननंतरच्या व्यवसायाच्या संधी' या विषयावर बोलताना टेक्‍स्टाईल व गारमेंटिंग इंडस्ट्रीज आणि क्‍लस्टरबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 
या वेळी डॉ. कांबळे म्हणाले, गारमेंट व्यवसायात उत्पादकांनी एकत्र आल्यास क्‍लस्टरच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो. क्‍लस्टरसाठी शासन 90 टक्के अनुदान देते. 10 टक्के एकत्र आलेल्या उत्पादकांचा हिस्सा असतो. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्रात क्‍लस्टरबाबत माहिती घ्या. एकत्र आल्यास मोठे प्रोजेक्‍ट सुरू करता येतात. सध्या कोव्हिडमुळे पीपीई किट व मास्कची मागणी मोठी आहे. यासाठी टेक्‍निकल टेक्‍स्टाईल मशिनरींची गरज असते. "सिट्रा'चे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर पीपीई किट, मास्क व हॅंडग्लोव्ह्‌ची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येते. त्याचप्रमाणे पडदे, बेडशीट, ब्लॅंकेट्‌स, पिलोकव्हर, सोफासेट कव्हर आदींमध्येही खूप संधी आहेत. 
आपल्या परिसरात कच्चा माल व आपल्याकडे स्किल असेल तर उद्योग सुकर होतो. व्यवसायात जोखीम असतात मात्र त्यावर मात करून यश मिळवल्यास भविष्य उज्ज्वल आहे. कोरोनाचे संकट टळेल, त्यानंतरची तयारी आता करायला हवी. जे सध्या व्यवसायात आहेत त्यांनी नवीन संधींचा शोध घ्यावा, असे सांगून डॉ. कांबळे यांनी क्‍लस्टरमार्फत यशस्वी उद्योजकांची माहिती दिली. 

हे उद्योग झाले क्‍लस्टरमुळे मोठे 

  • अमरावतीत फ्रॉक क्‍लस्टर सुरू झाले. तेथे नवजात बालकांपासून दोन वर्षे वयोगटाच्या बालकांसाठी लागणारे सर्व कपडे मोठ्या प्रमाणात तयार होतात. 
  • उस्मानाबाद येथील महिलांनी एकत्र येऊन क्‍लस्टरमार्फत मास्क, डॉक्‍टरांसाठी पीपीई किट निर्मिती सुरू केली. मोठ्या हॉस्पिटलकडून मागणी सुरू आहे. या उद्योगाद्वारे 60 महिलांना रोजगार मिळाला. 
  • * सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळमधील एका दाम्पत्याकडून कॉटन हॅंडग्लोव्ह्‌जची निर्मिती केली जात आहे. यामुळे 600 ते 700 महिलांना रोजगार मिळाला. 

सोलापुरात जास्तीत जास्त क्‍लस्टरची आवश्‍यकता 
सोलापुरात चादरनंतर आता टेरी टॉवेलची उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. गेल्या वर्षी उत्पादकांनी एकत्र येऊन व्हायब्रंट टेरी टॉवेल प्रदर्शन भरवले. देश-विदेशातील ग्राहकांना बोलावून आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग केले. सोलापूरच्या उत्पादकांनी दाखवून दिले, एकत्रित आल्यास मोठ्या प्रमाणात मार्केटिंग शक्‍य आहे. त्याचा फायदा प्रत्येक उत्पादकाला होईल. आता सोलापूरला जास्तीत जास्त क्‍लस्टर होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन डॉ. कांबळे यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com