लॉकडाउन शिथिलीकरणानंतर "या' उद्योजिकांचा जीव भांड्यात 

Gru udyog
Gru udyog

सोलापूर : लॉकडाउनमुळे अनेक छोट्या उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक महिलांचे गृहोद्योग या कालावधीत ठप्प झाले आहेत. काही महिलांनी बॅंकेतून कर्ज काढून गृहोद्योग सुरू केले होते. त्यांची उत्पादने ठप्प झाल्याने बॅंकेच्या हप्त्यांची चिंता लागली आहे. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये वर्दळ सुरू झाली आणि गृहिणींचा गृहोद्योग हळूहळू स्थिरावत असल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 

प्रमिला चव्हाण यांनी पतीच्या निधनानंतर घरगुती आटा चक्की सुरू करून कुटुंब सावरले. गेल्या वर्षी बॅंकेतून कर्ज काढून पापड मशिन घेऊन अर्थार्जनास सुरवात केली. नाचणी, साबू, तांदूळ, पोहे व उडीद पापडांचे उत्पादन घेतले. त्यांचे मार्केटिंगही सुरू केले. मात्र मागणी येईल अशी आशा असताना मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाला व व्यवसाय नुकसानीत आला. भांडवल गुंतवून तयार केलेले पापड मिळेल त्या किमतीत घरगुती ग्राहकांना विकावे लागले. आता बाजारपेठा सुरू होत आहेत; मात्र अपेक्षित मागणी नाही. तरी नाउमेद न होता त्यांनी पुन्हा मार्केटिंगची सुरवात केली आहे. 

जुळे सोलापूर येथील माधवी पानसरे यांनी गृहोद्योग म्हणून पापड, कुरड्या, सांडगे, शेवया तसेच डिंक लाडू, खजूर लाडू, नाचणीचे लाडू, अळीव व मुगाचे लाडू बनवतात. त्यांच्या उत्पादनांना सोलापूरसह पुणे येथे मागणी आहे. लॉकडाउनमुळे पुणे येथे उत्पादने जाणे बंद झाले तसेच सोलापुरातूनही मागणी घटल्याने उन्हाळी सीझनला फटका बसला. मात्र मे महिन्यात एका मार्केटिंग नेटवर्कच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना मागणी होत आहे. 

प्रशासनाने द्यावे गृहोद्योगाला प्रोत्साहन 
कर्ज काढून पापड व्यवसाय सुरू करून वर्षही झाले नाही तोच अडीच महिने व्यवसाय बंद होता. मागणीनुसार किरकोळ स्वरूपात पापड बनवून देत होते. मात्र मशिन व कच्च्या मालासाठी गुंतवलेले भांडवलही निघाले नाही. आता बाजारपेठा सुरू झाल्या मात्र अपेक्षित मागणी नाही. शासनाने छोट्या व्यावसायिकांचे कर्ज माफ करून गृहोद्योगाला प्रोत्साहन द्यावे. 
- प्रमिला चव्हाण, 
गृहोद्योजिका 

मागणीनुसार सुरू आहेत उत्पादने 
पती व सासूच्या मदतीने गृहोद्योग सुरू आहे. आमच्या विविध पदार्थांना सोलापूरसह पुणे येथेही मागणी आहे. मात्र लॉकडाउनमुळे उन्हाळी सीझनला फटका बसला. जास्त दिवस न टिकणाऱ्या विविध प्रकारच्या लाडूंना मागणी नसल्याने उत्पादन बंद ठेवले. आता बाजारपेठा सुरू होत असल्याने समाधान आहे. मागणीनुसार उत्पादने सुरू केली आहेत. 
- माधवी पानसरे, 
गृहोद्योजिका 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com