सोलापुरात मुक्काम करून चंद्रकांतदादांनी दिला पुणे पदवीधरचा मायक्रो मास्टर प्लॅन 

प्रमोद बोडके
Wednesday, 11 November 2020

पुणे पदवीधरची जागा पुन्हा भाजपकडे ठेवण्यासाठी सोलापूर भाजपमधील प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपची सर्व यंत्रणा पूर्वीपासून सज्ज आहे. 
- विक्रम देशमुख, भाजप शहराध्यक्ष 

सोलापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील मंगळवारी रात्री अचानक सोलापूरच्या दौऱ्यावर आले. सोलापुरातील हेरिटेज मंगल कार्यालयात सोलापूर शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत स्नेहभोजन घेत विधान परिषदेच्या पुणे पदवीधरच्या निवडणुकीची रणनीती आखली. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ पुन्हा एकदा यावर्षीच्या निवडणुकीत भाजपकडेच ठेवण्यासाठी त्यांनी सोलापुरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी मायक्रो मास्टर प्लॅन दिला. 

यावेळी सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख, सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापालिकेतील भाजपेचे गटनेते श्रीनिवास करली, रुद्रेश बोरामणी, बिज्जू प्रधाने, शशी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हेरिटेजमध्ये स्नेहभोजन घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात मुक्काम केला. त्यानंतर आज सकाळी ते पुण्याकडे रवाना झाले आहे. पुणे पदवीधरमधून भाजपने सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. सलग दोन वेळा या मतदार संघातून भाजपकडून चंद्राकांतदादा पाटील आमदार झाल्याने ही जागा तिसऱ्यांदा भाजपकडे ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे पदवीधरमध्ये मराठा उमेदवार देऊन भाजपने महाविकास आघाडीला पहिला मोठा धक्का दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After staying in Solapur, Chandrakantdada gave a Pune Master's Micro Master Plan