आंदोलनकर्त्या गोडसे यांनी केले शिरनांदगी तलावातील पाण्याचे पूजन

हुकूम मुलाणी 
Saturday, 29 August 2020

कृष्णा खोऱ्यात जादा झालेले पाणी हे दुष्काळी गावांना देण्याचा निर्णय घेतल्याने सध्या तालुक्‍यात पाणी येऊ शकते, याची एक प्रकारे प्राथमिक चाचणी झाली आहे. त्यामुळे भविष्यात हे पाणी या भागाला मिळण्याबाबत शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागला. त्यामुळे केलेले आंदोलन हे या पाणी योजनेच्या मार्गी लागण्यात सार्थकी ठरल्याचे समाधान व्यक्त करीत शैला गोडसे यांनी पाण्याचे पूजन करून समाधान व्यक्त केले. 

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नात लक्षवेधी झालेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात आल्याबद्दल या तलावात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनी या पाण्याचे पूजन करत केलेले आंदोलन सार्थकी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

हेही वाचा : "कर्तृत्ववान महिला नारीरत्न'ने घरगुती खाद्यपदार्थ निर्मात्या सुहिता गिरमे सन्मानित

म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात कधी येणार, अशी चर्चा गेल्या 21 वर्षांपासून तालुक्‍यामध्ये होती. त्यामध्ये राजकीय पातळीवर अनेकांनी प्रयत्न केले. त्यासंदर्भात आटपाडीला पाणी परिषदा देखील झाल्यारू परंतु मृगजळ वाटणारे पाणी मंगळवेढ्यात कधी येईल, याची उत्सुकता दक्षिण भागातील शेतकऱ्यांना लागून राहिली. 15 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या या योजनेचे काम गतवर्षी निधी उपलब्ध झाल्यामुळे सुरू असताना, या तलावात पाणी सोडण्याची तरतूद नाही म्हणून सांगणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात आणि ऐन दुष्काळात त्या तलावात पाणी सोडून या भागातील शेती व पशुधन जगवावे म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनी थंडीच्या दिवसात थेट तलावामध्ये आंदोलन केले. त्या वेळेस सोडण्यात आलेले पाणी पाणी वाटपाच्या साठमारीमुळे मंगळवेढ्यात येऊ शकले नाही. परंतु, महिला म्हणून तलावात केलेले आंदोलन राजकीय पातळीवर मात्र चर्चेचा विषय झाला. 

हेही वाचा : तीन दिवसांच्या कलाकारांची पाठ यंदा कोण थोपटणार? सजीव देखाव्यांअभावी पूर्वभागात सन्नाटा 

पाणी प्रश्‍नाच्या राजकारणात उडी घेतलेल्या त्या एकमेव महिला ठरल्या होत्या. त्यानंतर पाण्यातून दक्षिण भागातील सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खुर्द, सलगर बुद्रूक या गावांतील काही क्षेत्र वगळण्यात आल्याने थेट शेतकऱ्यांनी या योजनेचे काम बंद पाडले होते. त्या वेळी शेतकरी व तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्यात भैरवनाथ कारखान्याचे अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात बैठक घडवून या गावाचा समावेश करण्याबाबतचा सर्व्हे करण्याचे आदेश त्यांनी प्राप्त करून घेतले. तालुक्‍याच्या उजनी कालव्याचे पाणी व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात नंदेश्वर येथे आंदोलन केले तर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. 

कृष्णा खोऱ्यात जादा झालेले पाणी हे दुष्काळी गावांना देण्याचा निर्णय घेतल्याने सध्या तालुक्‍यात पाणी येऊ शकते, याची एक प्रकारे प्राथमिक चाचणी झाली आहे. त्यामुळे भविष्यात हे पाणी या भागाला मिळण्याबाबत शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागला. त्यामुळे केलेले आंदोलन हे या पाणी योजनेच्या मार्गी लागण्यात सार्थकी ठरल्याचे समाधान व्यक्त करीत शैला गोडसे यांनी पाण्याचे पूजन करून समाधान व्यक्त केले. उर्वरित गावांचा समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच देखील त्यांनी या वेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांसमोर केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitator Shaila Godse worshiped the water of Shirnandagi lake