"कर्तृत्ववान महिला नारीरत्न'ने घरगुती खाद्यपदार्थ निर्मात्या सुहिता गिरमे सन्मानित 

मिलिंद गिरमे 
Saturday, 29 August 2020

सुहिता गिरमे यांनी ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून कर्ज काढून विविध प्रकारचे मसाले, पीठ, लोणचे आदी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मशिनरी घेतली. त्यातून त्यांनी सोळा प्रकारचे उच्चप्रतीचे मानसी फूड प्रॉडक्‍टच्या नावाने उत्पादन करून माळीनगर, अकलूजसह पुणे येथे विक्री करून स्वतःचे उत्पन्नाचे साधन निर्माण केले. त्यांच्याकडून सात गरजू महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. 

लवंग (सोलापूर) : माळीनगर, चारी नंबर 21 येथील गृहिणी सुहिता उल्हास गिरमे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्याकडून कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार 2020 देऊन सन्मानित करण्यात आले. 

हेही वाचा : यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवात पुरोहितांच्या "दक्षिणे'वर पाणी 

सुहिता गिरमे यांनी ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून कर्ज काढून विविध प्रकारचे मसाले, पीठ, लोणचे आदी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मशिनरी घेतली. त्यातून त्यांनी सोळा प्रकारचे उच्चप्रतीचे मानसी फूड प्रॉडक्‍टच्या नावाने उत्पादन करून माळीनगर, अकलूजसह पुणे येथे विक्री करून स्वतःचे उत्पन्नाचे साधन निर्माण केले. त्यांच्याकडून सात गरजू महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. तर घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी पाच-सहा मुले ठेवल्याने त्यांच्याही हाताला काम मिळाले आहे. 

हेही वाचा : कोरोनातही "येथील' तुरुंग हाउसफुल्ल ! तुरुंगाची क्षमता 141 अन्‌ कैदी 357 म्हणून उभारले तात्पुरते जेल 

सुहिता गिरमे यांना या व्यवसायासाठी जयसिंग नगर येथील रघुनाथ नाईक यांच्याकडून मार्गदर्शन व स्फूर्ती मिळाली. तयार केलेले खाद्यपदार्थ दुकानात न ठेवता ऑर्डरप्रमाणे घरपोच दिले जाते. दुकानदारांना कमिशन देण्यापेक्षा त्या होतकरू मुलांना पैसे देतात. चांगल्या प्रतीचे उत्पादन असल्यामुळे पुणे येथील कलाग्राम, पूना क्‍लब, दोराबजी, पूनावडी, पीवाय वैद्य, भीमथडी या मोठ्या दुकानांतून मागणी होत असल्याने त्यांनाही पुरवठा करतात. गेली नऊ वर्षे त्या हा व्यवसाय करीत आहेत. याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनाच्या निमित्ताने संस्थापक - अध्यक्ष ऍड. कृष्णाजी जगदाळे यांनी त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि महावस्त्र देऊन सन्मान केला. 

श्रीमती गिरमे या तेलविरहित लिंबाचे व हिरव्या मिरचीचे लोणचे तसेच आंबा लोणचे, थालीपीठ, इडली डोसा, उपवासाचा डोसा पीठ, मूगडाळ, भाजणीचे पीठ, उपवास भाकरी पीठ, हळद पावडर, शेंगदाणा चटणी, लाल मिरची पावडर, सुका कांदा मसाला, वोट लाडू असे 16 प्रकारचे घरगुती पदार्थ विक्री करून चरितार्थ चालवतात. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awarded Nariratna Gaurav Award to Suhita Girme a home food producer