खरीप लागवडीच्या मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरच भरताहेत शेती शाळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन, मका, ऊस या पिकांच्या लागवडी बाबत तालुका कृषी कार्यालयाने मंडळ निहाय बांधावरील 56 शेती शाळांचे आयोजन केले आहे.

मोहोळ(सोलापूर)ः कोरोना संकटामूळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्‍यक मार्गदर्शन मिळवण्यासाठी एकत्र येत नसल्याने कृषी खात्याने बांधावरची शेतीशाळा या उपक्रम सूरु केला आहे. शेतकऱ्यांच्या लागवड व रोग व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाची अडचण सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. 

हेही वाचाः योगाच्या माध्यमातून कोरोना विरुध्द लढाईचा तो करतोय जागर 

चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन, मका, ऊस या पिकांच्या लागवडी बाबत तालुका कृषी कार्यालयाने मंडळ निहाय बांधावरील 56 शेती शाळांचे आयोजन केले आहे. सध्या सर्वत्र खरीप हंगामातील तूर, मका पेरणी सह ऊस लागवडीची कामे सुरू आहेत. 

हेही वाचाः जागतिक योग दिवसः स्वस्थ भारताची चळवळ 

पेरणी व लागवड शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या साठी कृषी विभागाने मंडळ निहाय शेती शाळेचे आयोजन केले आहे. तालुक्‍यात मोहोळ, पेनुर, नरखेड, कुरुल अशी चार कृषी मंडळे आहेत. शेतीशाळा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर घेतली जाते. त्या मंडळाचे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यात बीज प्रक्रिया कशी करावी, रासायनिक खतांचा संतुलित वापर, कीड रोग व्यवस्थापन आदी बाबत मार्गदर्शन केले जाते. थेट बांधावर शेतीशाळा असल्याने शेतकऱ्यांनाही ते सोईचे झाले आहे. 
सध्या काही भागात हुमणीचा प्रादुर्भाव सुरु आहे. शेतात असणारी बाभूळ, कडूनिंब या झाडावर हुमणीचे भुंगेरे तयार होतात. त्यामुळे ते भुंगेरे एकत्रित करून कसे नष्ट करावयाचे याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. या शेती शाळेतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. 

शेतीशाळांना मिळतोय प्रतिसाद 
आतापर्यंत 45 शेतीशाळा संपन्न झाल्या आहेत. परिसरातील शेतकरी उपस्थित राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन घेत आहेत. 
-एस.बी.मोरे, तालुका कृषी अधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agricultural schools are being set up on farmers' dams to guide kharif cultivation