जागतिक योग दिवस : स्वस्थ भारतासाठी योग चळवळ 

प्रशांत देशपांडे 
रविवार, 21 जून 2020

नैराश्‍य, भीती व तणाव वाढत चाललेला आहे. अशा स्थितीत जर युवकांनी योगसाधना केली तर त्याचा चांगला फायदा होईल. योगामुळे व्यसनी व्यक्तीला असामान्य अशी शक्ती मिळत जाते. ही शक्ती तो व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि अधोगतीकडे चाललेले जीवन प्रगतिपथावर नेण्यासाठी वापरू शकतो. 

सोलापूर : सध्या जगभरात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांत भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. तसेच, लॉकडाउनमुळे मानसिक आणि शारीरिक ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. स्वस्थ भारत उभारणीसाठी योग चळवळ महत्त्वाची आहे. 

नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तुम्ही शारीरिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. नियमित योग केल्याने मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर योगाभ्यास केला तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल. 

हेही वाचा : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी द्या या व्यवसायाला परवानगी

संपूर्ण जगाला दिलेली मोठी देणगी 
योग ही भारताने संपूर्ण जगाला आणि मानवतावादाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. संतुलित शरीर, मन आणि स्वास्थ्यासाठी योग हा उत्तम असल्याचे दिसून आले आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मनशांती, सुदृढ आरोग्य व स्वस्थ जीवनासाठी उपयोगी आहे. नियमित योगामुळे सर्व शारीरिक व्याधींवर मात करणे शक्‍य आहे. स्वस्थ भारताच्या उभारणीसाठी योग ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे.

 

मन सुदृढ तर शरीर सुदृढ 
प्राणायामाच्या माध्यमातून शरीरातील दोष दूर करता येतात. मन सुदृढ तर शरीर सुदृढ. शरीरातील श्‍वसनाचे प्रमाण असमान होण्यास कारण ताणतणाव, दूषित वातावरण, अकार्यक्षम फुप्फुस, चुकीचा आहार आदी प्राणायमाद्वारे नाडीशुद्धी केल्यामुळे शरीरातील मज्जासंस्था कार्यक्षम बनते. ध्यानधारणेने मन शुद्ध आणि स्थिर होते. चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते. त्याबरोबर शुद्धीच्या क्रिया संपूर्ण शरीराला निरोगी, निकोप ठेवतात. सध्या युवकांत व्यसनाधीनता, नैराश्‍य, भीती व तणाव वाढत चाललेला आहे. अशा स्थितीत जर युवकांनी योगसाधना केली तर त्याचा चांगला फायदा होईल. योगामुळे व्यसनी व्यक्तीला असामान्य अशी शक्ती मिळत जाते. ही शक्ती तो व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि अधोगतीकडे चाललेले जीवन प्रगतिपथावर नेण्यासाठी वापरू शकतो. 

हेही वाचा : अरेच्चा..! दिवसभर भटकंती करूनही का राहतेय यांची बॅग रिकामी? 

नियमित प्राणायामाचे अनेक फायदे 
शरीर व मन सशक्त करण्यासाठी मदत करता येते हे आता सर्वज्ञात आहे. अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी असे प्राणायाम नियमित केले तर अनेक फायदे होतात. अर्थात योगाभ्यास आणि प्राणायाम या दोन गोष्टी कोणालाही सहज करता येण्यासारख्या असूनही उगाचच असा सर्वसाधारण गैरसमज आढळतो की या गोष्टी योगी पुरुषांनी, साधू संन्यासी लोकांनी करायच्या असतात. सर्वसामान्य माणसाचे हे काम नव्हे. या गैरसमजांमुळे अनेक लोक या बाबतीत जरा टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीचे असतात. 
- सुधा अळ्ळीमोरे, 
महिला केंद्रीय प्रभारी, पतंजली योग समिती 

कमी होतो मानसिक तणातनाव 
नियमित योग केल्याने नैराश्‍य दूर होऊ शकते. तसेच योगा मेंदूतील विशिष्ट रसायनांची पातळी वाढविण्यास मदत करतो. तणावाला कारणीभूत असणारे हार्मोन कमी करण्यास योग मदत करतो. त्यामुळे तणाव कमी होतो. योगामुळे मानसिक तणाव कमी होतो. योग केल्यामुळे काय होतं तर माणसाला कसलीही भीती वाटत नाही. योग ही एक उत्तम विद्या आहे. पालकांनी लहानपणापासून आपल्या मुलांना योगाची गोडी लावली पाहिजे. भविष्यात चांगली पिढी घडवायची असेल तर मुलांना योगाची सवय लावणं ही पालकांची जबाबदारी नव्हे तर कर्तव्यच आहे. 
- ज्ञानेश्‍वर शिंदे, योगशिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Yoga Day: Yoga Movement for a Healthy India