अजितदादांनी दहा मिनिटात "बोरामणी'ला दिले पन्नास कोटी 

प्रमोद बोडके
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

दादा म्हणाले, होटगीरोडचे विमानतळ लहान 
बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर चर्चा होत असताना सध्या सोलापुरात असलेल्या होटगी रोडवरील विमानतळाबाबतही चर्चा झाली. होटगी रोडवरील विमानतळ हे लहान असून आपल्यालाला मोठे विमानतळ तयार करायचे असल्याचेही सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बैठकीत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उडाण योजनेत सोलापूरचा समावेश झाला होता. होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्नही झाला होता. येथील विमानसेवेला सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीसह इतर अडथळे येत असल्याने सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही. राज्यातील सरकार बदलल्यानंतर सरकारने आता बोरामणी विमानतळाच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे आजच्या बैठकीतून दिसले. 

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने राज्याला परिचित आहेत. त्यांच्या याच शैलीचा प्रत्यय आज सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी घेतला. मागील पाच वर्षांपासून बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निधी मागणाऱ्या सोलापूरकरांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज अवघ्या दहा मिनिटाच्या बैठकीत पन्नास कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/stop-crying-poverty-country-will-go-away-260086">हेही वाचा - रडणे थांबवा, देशातील गरिबी हटेल 
बोरामणी येथील विमानतळाचे काम तत्काळ सुरू करा. भूसंपादन आणि वन जमिनीचे निर्वणीकरण यासह इतर प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून विमानतळाच्या कामाला सुरवात करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील विमानतळाच्या प्रश्‍नासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पुण्यात बैठक घेतली. या बैठकीला महसूल प्रशासनासह महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. बोरामणी व पुरंदर येथील विमानतळाच्या भूसंपादन व इतर प्रश्‍नांवर या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. पुरंदर विमानतळाची बैठक तब्बल चाळीस ते पन्नास मिनिटे चालली. 
हेही वाचा - वाराणसीत चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्‌घाटन 
सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी विमानतळाचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या दहा मिनिटात संपविला. तुम्हाला किती रुपयांची आवश्‍यकता आहे अशी विचारणा त्यांनी सोलापुरातील अधिकाऱ्यांकडे केली. सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी पन्नास कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याचे सांगताच, तुम्हाला निधी मंजूर करतो तुम्ही तत्काळ कामाला सुरवात करा. तुमच्या पातळीवर प्रलंबित असलेले बोरामणी विमानतळाचे प्रश्‍न सोडवा अशी सूचनाच त्यांनी आज केली. बोरामणी विमानतळासाठी आणखी आवश्‍यक असलेला निधी वेळेत उपलब्ध करून देऊ असा विश्‍वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, एमएडीसीचे मंगेश कुलकर्णी, बोरामणी विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, दक्षिण सोलापूरच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Dada gave fifty crores to Boramani in ten minutes