रडणे थांबवा, देशातील गरिबी हटेल 

प्रमोद बोडके
Saturday, 8 February 2020

टिटॅनिअमच्या वाळूचे कळेना मोल 
बंगालच्या किनाऱ्यावर असलेल्या वाळूमध्ये मोठ्या प्रमाणात टिटॅनियम आहे. पुढची पाचशे वर्षे जगाला पुरवठा करता येईल एवढ्या टिटॅनिअमचे उत्पादन येथून शक्‍य आहे. त्सुनामी आल्यानंतर विध्वंस झाला हे जरी खरे असले तरीही या त्सुनामीमुळे आपल्याला निसर्गाने दुप्पट वाळू दिली आहे. ही वाळू आपण मातीमोल दराने विकतो. या वाळूवर प्रक्रिया करून त्यातून टिटॅनियम निर्मितीसाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षाही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणुवैज्ञानिक आणि रसायन तंत्रज्ञान शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी व्यक्त केली. 

सोलापूर : जगातील 140 देशांच्या यादीत भारताचा दरडोई उत्पन्नात खालून बारावा क्रमांक लागतो. इतर देश नवनिर्मितीसाठी, संशोधनासाठी ज्या पद्धतीने ध्यास घेतात तसाच ध्यास भारतीयांनीही घ्यायला हवा. विद्यापीठे व संशोधन संस्था औद्योगिक क्षेत्राकडे बोट दाखवितात, औद्योगिक क्षेत्र सरकारकडे बोट दाखविते आणि सर्वसामान्य लोक राजकारण्यांना नावे ठेवतात ही आपल्या देशाची आजची स्थिती आहे. रडण्यासाठी भरपूर कारणे आहेत. रडणे हा भारतीयांचा गुणधर्म आहे. देशाची गरिबी हटविण्यासाठी रडणे थांबवा. आत्मचिंतन करा, प्रसन्न रहा, शांत मनाने नवनिर्मितीचा विचार करा असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणुवैज्ञानिक आणि रसायन तंत्रज्ञान शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी दिला. 
हेही वाचा - पंढरपुरात सामाजिक संघटना, महाराज मंडळीत का झाली हमरी तुमरी 
मराठी विज्ञान परिषदेच्या सोलापूर विभागाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथील सरस्वती मंदिर प्रशालेत आजपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. विज्ञान तंत्रज्ञानातून संपत्ती निर्मिती या विषयावर डॉ. जोशी यांनी जागतिक पातळीवरील तुलनात्मक व्याख्यान दिले. डॉ. जोशी म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था शेती, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रावर अवलंबून आहेत. या क्षेत्रात संशोधन, नवनिर्मिती झाल्याशिवाय देशातील गरिबी हटणे कठीण आहे. देशात सातशेहून अधिक विद्यापीठे तर एक हजारांहून अधिक संशोधन संस्था आहेत. देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या प्रमाणे चळवळ उभा राहिली त्याच प्रमाणे देशाची गरिबी दूर करण्यासाठी नवनिर्मितीची चळवळ आवश्‍यक आहे. नवनिर्मितीसाठी पुढाकार आवश्‍यक आहे. असा सल्लाही डॉ. जोशी यांनी दिला. डॉ. जोशी यांचे स्वागत ऍड. रघुनाथ दामले, ऍड. पांडुरंग देशमुख यांनी केले. यावेळी मोहनराव दाते, मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, प्रा. व्यंकटेश गंभिरे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop crying, poverty in the country will go away