स्पृहणीय : लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी दिली 88 क्विंटल ज्वारी 

Akkalkot
Akkalkot

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी अनंत अडचणी बाजूला ठेवत तालुक्‍यातील गरीब व गरजूंना मदत व्हावी म्हणून तहसीलदार अंजली मरोड व कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन दिवसांत 88 क्विंटल ज्वारी व चार क्विंटल गहू दिला आहे. 

शेतकऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद 
कोरोना विषाणूचे महाराष्ट्रावर संकट आहे. त्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश देखील केला आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या लॉकडाउन आहे. यात गरजूंना मदत व्हावी म्हणून तहसीलदार अंजली मरोड यांनी तालुकावासीयांनी, "एका सधन व्यक्तीने गावातील दुसऱ्या गरजू, गरीब कुटुंबास मदत करावी,' असे आवाहन केले होते. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक कुटुंबास 10 किलो ज्वारी देण्यासाठी सध्या ज्वारीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी बंधूंना आवाहन देखील केले. त्याला दोन दिवसांपासून स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळाला आहे. 

88 क्विंटल ज्वारीची मदत 
सलगर येथे 367 शेतकऱ्यांनी 40 क्विंटल ज्वारी मदत केली. त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी आज प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अंजली मरोड, महिला व बालकल्याण सभापती स्वाती शटगार, गटविकास अधिकारी महादेव कोळी, सहायक गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे आदी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर व त्यांचे सहकारी कृषी अधिकारी विद्याधर वाघमोडे, तोटप्पा बिराजदार, नीलकंठ पारे, अभिषेक जोजन, योगेश कटारे, चिदानंद खोवण, सतीश वाघमोडे, वसवराज माने आदी व कर्मचारी यांच्या नियोजनातून हे काम पूर्ण करण्यात आले. सलगर, काझीकणबस, किणीवाडी, किणी, मंगरूळ, हंजगी, घुंगरेगाव, जेऊर, कडबगाव व इतर गावांतील शेतकरी मिळून 88 क्विंटल ज्वारी मदत मिळाली आहे. नेहमी आपल्या पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, कवडीमोल दराने विकणारा भाजीपाला, दुधाचे ढासळते दर, बॅंकांचे वाढते कर्ज, सतत अवकाळी पावसाचा फटका यामुळे शेतकरी खचलेला आहे. या परिस्थितीत सुद्धा कोरोनाचे संकट हे एक आव्हान समजून त्यातून एकमेकांना मदत करीत त्याचा मुकाबला करायचाच या जिद्दीने शेतकरी बंधू आपल्या घरी वर्षभर लागणाऱ्या ज्वारीतील काही धान्य सामाजिक बांधिलकी म्हणून गरजवंताला देण्यासाठी मदत करीत आहेत. या बळिराजाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. स्वतःचे दुःख आणि अडचण बाजूला ठेवून इतरांना मदत करण्याची ही भूमिका स्पृहनीय आहे. 

अक्कलकोट तालुका हा ज्वारीसाठी प्रसिद्ध असून तालुक्‍यातील प्रमुख पीक रब्बी ज्वारी आहे. तालुक्‍यातील बहुभूधारक शेतकऱ्यांनी संचारबंदीच्या काळातील गरजवंतांना वाटपासाठी ज्वारी दान करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे. त्याला अनुसरून तालुक्‍यात नियोजन करण्यात आले आहे. त्यातून खूप मोलाची मदत होत आहे. यापुढेही शेतकऱ्यांनी ज्वारी दान करावी ज्यातून सर्वच गरजवंतांना मदत करता येईल. 
- अंजली मरोड, तहसीलदार 

जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या सूचनेनुसार तालुक्‍यातील शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात आले होते. त्याला अडचण असलेल्यासह सर्वच शेतकरी वर्गांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात तालुक्‍यातील बहुभूधारक व जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनी या संकटसमयी पुढाकार घ्यावा आणि मदत करावी जेणेकरून तालुक्‍यातील सर्वसामान्य गरजूंची कुठलीच गैरसोय होणार नाही. 
- सूर्यकांत वडखेलकर, 
तालुका कृषी अधिकारी 

गावकरी बंधूंनी कोरोनाच्या अस्मानी संकटात कष्टकरी व गरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणून घरटी एक शेर ते एक क्विंटल एवढी मदत केली आहे. असे एकूण 40 पोते धान्य सुपूर्त करण्यात आले आहे. गावकरी बंधूंनी स्वतःची अडचण बाजूला ठेवून मदत केले त्यासाठी आभार मानावे तेवढे थोडेच आहे 
- सुरेखा गुंडर्गी, 
सरपंच, सलगर 

कृषी खात्याने आवाहन केल्याप्रमाणे यथाशक्ती म्हणून आम्ही ज्वारी मदत करीत आहोत. कष्टकरी मजुरांचे दिवसभर काम केल्याशिवाय पोट भरत नाही. त्यांना मदत आवश्‍यक आहे. ज्यांना शक्‍य आहे त्यांनी मदत जरूर करावी आणि या संकटातून बाहेर येण्यास सहकार्य करावे. 
- नागनाथ सुरवसे, 
नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com