अकलूज- बारामती एसटी वाहतूक थांबविली ! परतीच्या पावसामुळे बार्शी, पंढरपूर, अकलूज, बारामती, हैदराबाद मार्गही बंद 

तात्या लांडगे
Wednesday, 14 October 2020

ठळक बाबी... 

  • सोलापूर शहर- जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा 
  • जिल्ह्यातील एसटी वाहतुकीचे नियोजन विस्कळीत 
  • पावसामुळे लहान ओढे- नाले तुडूंब; अनेक गावांचा तुटला संपर्क 
  • पाण्याचा प्रवाह वेगाचा असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही मार्गांवरील एसटी वाहतूक थांबविली 
  • सोलापूर- बार्शी, वैराग- बार्शी, मोहोळ- वैराग, टेंभूर्णी- अकलूज, अकलूज- बारामती, अकलूज- पंढरपूर, हैदराबादचे मार्ग बंद 

सोलापूर : जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. 13) रात्रीपासून आज दिवसभर थैमान घातले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने सोलापूर- बार्शी, वैराग- बार्शी, मोहोळ- वैराग, टेंभूर्णी- अकलूज, अकलूज- बारामती, अकलूज- पंढरपूर, हैदराबाद या मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा थांबविली आहे.

पावसामुळे तुटला अनेक गावांचा संपर्क 
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रवाशांची सुरक्षितता म्हणून सोलापूर- बार्शीसह सात मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. तर अन्य ठिकाणी पावसाची स्थिती पाहून वाहतूक करावी, अशा सूचना संबंधित आगारप्रमुखांना दिल्या आहेत. पावसाची तथा पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. 
- दत्तात्रय कुलकर्णी, वाहतूक व्यवस्थापक, सोलापूर विभाग  

 

पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर सोलापूर, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड यासह अन्य जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टी झाली आहे. सोलापुरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या काळात सर्वाधिक 78 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजवरच्या इतिहासातील ही सर्वाधिक नोंद असल्याची चर्चा आहे. बार्शी, अकलूज, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, माळशिरस या तालुक्‍यांत मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे एसटीने प्रवासी वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पाण्याचा प्रवाह पाहून वाहतूक सुरु करण्याचा संबंधित आगारप्रमुखांनी निर्णय घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अद्याप अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक सेवा कधीपर्यंत सुरु होईल, याबाबत निश्‍चितपणे सांगता येत नसल्याचेही सोलापूर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

ठळक बाबी... 

  • सोलापूर शहर- जिल्ह्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा 
  • जिल्ह्यातील एसटी वाहतुकीचे नियोजन विस्कळीत 
  • पावसामुळे लहान ओढे- नाले तुडूंब; अनेक गावांचा तुटला संपर्क 
  • पाण्याचा प्रवाह वेगाचा असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही मार्गांवरील एसटी वाहतूक थांबविली 
  • सोलापूर- बार्शी, वैराग- बार्शी, मोहोळ- वैराग, टेंभूर्णी- अकलूज, अकलूज- बारामती, अकलूज- पंढरपूर, हैदराबादचे मार्ग बंद 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akluj-Baramati ST traffic stopped; Due to return rains, Barshi, Pandharpur, Akluj, Baramati and Hyderabad roads were also closed