अकलूज आगाराच्या तोट्यात वाढ; 20 टक्केच प्रवासी 

शशीकांत कडबाने 
Wednesday, 2 September 2020

आगार व्यवस्थापक तानाजी पवार म्हणाले, एसटी महामंडळ कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व खबरदारी घेत असून अकलूज परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी अधिकारी नेमले आहेत. प्रवाशी व मालाची वाहतूक किफायतशीर असून याचा फायदा नागरिकांनी घ्यावा. 

अकलूज (सोलापूर) : एसटी महामंडळाच्या अकलूज आगारातून सुरू करण्यात आलेल्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तोट्यात असलेले महामंडळ आणखी तोट्यातच जात असल्याचे चित्र दिसत आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील अनलॉक सुरू झाल्यानंतर अकलूज आगारातून फक्त जिल्ह्यातच सांगोला, टेंभुर्णी आदी मार्गावर गाड्या सोडण्यात आल्या. त्यानंतर गुरूवार (ता. 20)पासून आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. या अंतर्गत अकलूज ते पुणे सकाळी 6.30 वा. व नंतर दर दोन तासांच्या अंतराने चार गाड्या तर पुणे-अकलूज परतीच्या प्रवासासही गाड्या उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सोलापूरसाठीही चार गाड्या तर चिपळून व कोल्हापूर येथेही बस सोडण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता महामंडळ घेत आहे. प्रत्येक खेपेनंतर पूर्ण गाडीचे सॅनिटायझिंग केले जात असून वाहक व चालक यांना मास्क उपलब्ध करून देत आहे. कोरोनामुळे 50 टक्केच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असून त्यातही फक्त 20 टक्के प्रवासी सध्या मिळत आहे. त्यामुळे 80 टक्के प्रवासी वाहतूक कमी होत असल्याने महामंडळास जास्त तोटा होत आहे. 
महामंडळाने माल वाहतुकीसही सुरूवात केली असून महामंडळाकडून अत्यंत किफायतशीर दरात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मालवाहतुकीची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. मालवाहतुकीसाठी प्राधान्याने बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत 

तिकीट दराबाबतचा गैरसमज 
कोरोनामुळे एका सिटावर एक प्रवाशी याप्रमाणे वाहतुकीस परवानगी असल्याने प्रवाशांकडून डबल भाडे घेतले जाते, असा गैरसमज ग्रामीण भागातून पसरवला जात असून प्रवाशांकडून एसटी महामंडळ जुन्याच दरानुसार एका प्रवाशाकडून एकाच सीटचे तिकीट घेत आहे. 

नीटच्या परीक्षार्थींसाठी खास सोय 
ज्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी सोलापूर येथे जायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पहाटे 4.30 वाजता बस सोडण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून मागणी आल्यास आणखी बस सोडण्यात येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akluj increase in ST depot losses only 20 per cent commuters