
उपप्रादेशिक परिवहन अकलूज कार्यालयाच्या वायुवेग पथकाने परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडून वेळोवेळी आलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे 1 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत 32 कामकाजाच्या दिवसात 32 लाख दंड व कर वसूल केला. या वायुवेग पथकास देण्यात आलेले महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
लवंग (सोलापूर) : वाहतुकीचे नियम मोडून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर अकलूज उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला असून, 32 दिवसांत 208 वाहन मालकांकडून दंड आणि कर असे 32 लाख रुपये वसूल केले आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अकलूज कार्यालयाच्या वायुवेग पथकाने परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडून वेळोवेळी आलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे 1 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत 32 कामकाजाच्या दिवसात 32 लाख दंड व कर वसूल केला. या वायुवेग पथकास देण्यात आलेले महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले. ही कारवाई उद्दिष्टापुरती नसून, यापुढेही दोषी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
भार क्षमतेपेक्षा ज्यादा मालाची वाहतूक करणाऱ्या 48 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 27 लाख 54 हजार दंड आणि 1 लाख 89 हजार कर वसूल करण्यात आला. तसेच मोटार वाहन कायद्याप्रमाणे विना हेल्मेट वाहन चालवणे, जादा वेगाने वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, विना नोंदणी वाहन चालवणे, योग्यता प्रमाणपत्र नसताना वाहनांचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे अशा प्रकारच्या वाहनधारकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 3 लाख 57 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. तर याच कालावधीत वायुवेग पथकामार्फत 160 दोषी वाहनांच्या वाहन मालकांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवून अपघात टाळावेत. प्रत्येक चालकाने लायसन काढल्याशिवाय वाहन चालवू नये. लायसन काढल्यामुळे वाहतुकीच्या नियमांची माहिती होते. वाहन मालकाने वाहन खरेदी करताना वाहनाचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल