
माळशिरस तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
माळीनगर (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून सोमवारी सकाळी साडेआठ वाजता नवीन शासकीय गोदाम, म्हसवड रोड, माळशिरस येथे मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याचे तहसीलदार जगदीश निंबाळकर व नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी सांगितले.
तालुक्यात 44 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 77.45 टक्के मतदान झाले आहे. 59 हजार 894 पुरुष, 53 हजार 57 स्त्री व इतर दोन अशा एकूण एक लाख 12 हजार 953 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 913 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान यंत्रातून उलगडणार आहे. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्या होणार असून त्यासाठी 14 टेबलांची व्यवस्था केली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलसाठी एकावेळी दोन कर्मचारी नियुक्त केले असून एकूण 100 कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक केली आहे.
सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पहिल्या फेरीत शेंडेचिंच, तोंडले, दसूर, बोंडले, कुसमोड. तर दुसऱ्या फेरीत भांब, येळीव, विजयवाडी, खळवे, विठ्ठलवाडी. तिसऱ्या फेरीत बिजवडी, शिंगोर्णी, गारवाड, बचेरी; चौथ्या फेरीत रेडे, पिरळे, गणेशगाव, कोथळे; पाचव्या फेरीत चाकोरे, तांबवे, लोणंद, बांगर्डे ; सहाव्या फेरीत झोरी, मांडकी, जळभावी, शिंदेवाडी; सातव्या फेरीत एकशिव, गिरवी, पिंपरी, कळंबोली; आठव्या व नवव्या फेरीत तांदुळवाडी, मोरोची, संग्रामनगर, उंबरे वेळापूर; दहाव्या व 11 व्या फेरीत फोंडशिरस, फडतरी, कुरबावी, बोरगाव या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. अकलूजची मतमोजणी 12 ते 20 व्या फेरीदरम्यान, कोंडबावी, मळोली, मांडवे यांची 12 ते 15 व्या फेरीत तर नातेपुतेची 12 ते 17 व्या फेरीत मतमोजणी होणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मतमोजणी केंद्रापासून 100 मीटर अंतरावर बॅराकेडिंग करण्यात येणार आहे. माळशिरस येथील अहिल्यादेवी चौकापासून पोलिस बंदोबस्त असणार आहे. मतमोजणी दरम्यान या चौकातून वाहतूक वळविण्यात येणार आहे. उमेदवार व त्याच्या एका प्रतिनिधीस मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. पहिला निकाल सकाळी साडेनऊपर्यंत हाती येईल व दुपारी अडीच वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होईल, असा विश्वास तहसीलदार निंबाळकर यांनी व्यक्त केला.