जुलैपर्यंत 100 टक्के पीक कर्ज वाटप करा 

प्रमोद बोडके
सोमवार, 22 जून 2020

सोलापूरच्या शासकीय कृषी महाविद्यालयाबाबत निर्णय घेऊ 
सोलापुरात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झालेले आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव रखडलेला आहे. सोलापुरातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावाची आपण स्वत: पाहणी करू, आवश्‍यकता असल्यास या ठिकाणी शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी माहितीही कृषिमंत्री भुसे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक पतपुरवठा व्हावा यासाठी प्रभावी उपाययोजना करा. सोलापूर जिल्ह्यासाठी एक हजार 438 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सध्या 35 टक्के कर्जवाटप झाले आहे. जून अखेरपर्यंत 50 टक्के तर जुलै अखेरपर्यंत उद्दिष्टाच्या 100 टक्के कर्जवाटप करावे, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोलापूरच्या प्रशासनाला दिल्या आहेत. 

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर कृषिमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांच्यासह कृषी, सहकार, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषिमंत्री भुसे म्हणाले, दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकाच शेतकऱ्याला जास्तीची रक्कम देण्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट बॅंकांनी डोळ्यासमोर ठेवावे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा. पीक कर्ज वाटपासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. 

बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जय किसान आणि झुआरी कंपनीची बनावट खते विकणाऱ्यांवर कृषी विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. मका खरेदीचा राज्याचा कोटा संपल्याने राज्यातील काही जिल्ह्यांतील मका खरेदी बंद झाली आहे. मका खरेदीचा कोटा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मका खरेदीचा कोटा वाढल्यानंतर पुन्हा एकदा मका खरेदी सुरू होईल. हरभरा खरेदीसाठी येणाऱ्या अडचणीही सोडविल्या जातील, अशी माहिती कृषिमंत्री भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allocate 100 percent crop loan by July