उत्पन्न बुडाले तरी साडेतीन कोटी रुपये केले गरिबांसाठी खर्च

Although the income has gone down, Rs 3.5 crore has been spent for the poor
Although the income has gone down, Rs 3.5 crore has been spent for the poor

पंढरपूर ः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात प्रथमच प्रशासनाने आषाढी पालखी सोहळा व पंढरपूरची यात्रा रद्द केली. येत्या 1 जुलै रोजीची आषाढी एकादशी वारकरी आणि हरिनामाच्या जयघोषा विना साजरी होत आहे. त्यामुळे विठुरायाची पंढरी सुनीसुनी वाटू लागली आहे. अशातच साक्षात विठुरायाच्या दक्षिणा पेटीतही यंदा खडखडाट पाहायला मिळणार आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर समितीचे सुमारे 17 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. उत्पन्न बुडाले असले तरी कोरोना काळात विठुराया गरिबांच्या मदतीसाठी धावून आला आहे. मंदिर समितीने गोरगरिबांसाठी आतापर्यंत साडेतीन कोटी रुपये खर्च केले आहेत. 

मंदिर बंद असल्याने परिसरातील बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मंदिर परिसरातील प्रासादिक वस्तू विक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे येथील किरकोळ व्यापारी आणि व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. येथील व्यापाऱ्यांचे दररोजचे सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अशातच आता सर्वात मोठी आणि मुख्य असलेली आषाढी यात्राही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्याविना वारीचा सोहळा साजरा होणार आहे. 

दरवर्षी 13 ते 14 लाख भाविक आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येतात. आधी 15 दिवस यात्रेची तयारी सुरू होती. यंदा यात्राच भरणार नसल्याने पंढरपूर शहरात सगळीकडे सामसूम दिसत आहे. या सगळ्याचा आर्थिक फटका विठ्ठल मंदिर समितीला बसला आहे. आषाढी यात्रेत दरवर्षी मंदिर समितीला जवळपास पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, यावर्षी हे उत्पन्न मिळणार नाही. गेल्या तीन महिन्यांतील 12 कोटी आणि आषाढी यात्रेदरम्यान मिळणारे पाच कोटी असे मिळून सुमारे 17 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 

याशिवाय मंदिर परिसरातील बाजारपेठेवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. यात्रा काळात पेढे, उदबत्ती, बत्तासे, चिरमुरे, पितळी मूर्ती, फोटो फ्रेम, बुक्का, कुंकू अशा प्रासादिक वस्तूंना मोठी मागणी असते. या वस्तू विक्री व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यंदा कोरोनामुळे येथील व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी लाखोंची उलाढाल असलेल्या येथील बाजारात या वेळी मात्र शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळत आहे. एकूणच वारीवर मदार असलेल्या पंढरपूरकरांचे आर्थिक गणित यावर्षी मात्र कोलमडले आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघडल्यानंतरच पंढरपूरची अर्थव्यवस्था रुळावर येईल एवढीच एक आशा उरली आहे. 

17 कोटींचे उत्पन्न बुडाले
गेल्या तीन महिन्यांपासून विठ्ठल मंदिर बंद आहे. बंद काळात मंदिर समितीचे सुमारे 12 कोटींचे तर आषाढी यात्रा कालावधीत दरवर्षी मिळणारे सुमारे पाच कोटी असे मिळून आतापर्यंत सुमारे 17 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. आतापर्यंत ऑनलाइनद्वारे फक्त साडेचार लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. 
- विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com